अमली पदार्थ न दिल्याने तरुणाने केली आत्महत्या; अमली पदार्थ विकणाऱ्यावर कारवाई करण्याची आईची मागणी

By पंकज पाटील | Published: June 6, 2023 08:28 PM2023-06-06T20:28:15+5:302023-06-06T20:28:41+5:30

अंबरनाथ स्टेशन परिसरात असलेल्या भगतसिंग नगरमध्ये उघडपणे अमली पदार्थांची विक्री होत असताना देखील पोलीस प्रशासन कोणतीही कारवाई करताना दिसत नाही.

Youth commits suicide due to lack of drugs; Mother demands action against drug dealer | अमली पदार्थ न दिल्याने तरुणाने केली आत्महत्या; अमली पदार्थ विकणाऱ्यावर कारवाई करण्याची आईची मागणी

अमली पदार्थ न दिल्याने तरुणाने केली आत्महत्या; अमली पदार्थ विकणाऱ्यावर कारवाई करण्याची आईची मागणी

googlenewsNext

अंबरनाथ: अंबरनाथच्या भगतसिंग नगर परिसरामध्ये अमली पदार्थाच्या आहारी गेलेल्या एका तरुणाने आत्महत्या केल्याचा प्रकार समोर आला आहे. अमली पदार्थाची विक्री करणाऱ्याने त्या तरुणाला अमली पदार्थ न दिल्याने व त्याला शिवीगाळ केल्याने त्याच रागात त्यांने ही आत्महत्या केल्याचा आरोप त्याच्या कुटुंबीयांनी केला आहे. दरम्यान, अंबरनाथ स्टेशन परिसरात असलेल्या भगतसिंग नगरमध्ये उघडपणे अमली पदार्थांची विक्री होत असताना देखील पोलीस प्रशासन कोणतीही कारवाई करताना दिसत नाही. 

अंबरनाथ रेल्वे स्थानकाला लागूनच असलेल्या भगतसिंग नगर आणि सिद्धार्थ नगर या परिसरात अमली पदार्थांचे विक्री करणारे गावगुंड मोठ्या प्रमाणात वावरत आहेत. या परिसरात उघडपणे अमली पदार्थांची विक्री होत असल्याने बदलापूर, वांगणी, उल्हासनगर एवढेच नव्हे तर कल्याण मधून देखील काही तरुण या अमली पदार्थांची खरेदी करण्यासाठी येथे असतात. झोपडपट्टी वस्ती असलेल्या या भगतसिंग नगर परिसरातील अनेक तरुण देखील या अमली पदार्थाच्या आहारी गेले आहेत. या अमली पदार्थांच्या खरेदीसाठी चोरी करण्याचे प्रकार देखील गेल्या काही दिवसात वाढले होते. असे सर्व प्रकार घडत असताना देखील अंबरनाथ पोलीस ठाण्यामार्फत या अमली पदार्थ विक्री करणाऱ्यांवर कोणतेही कारवाई होताना दिसत नाही. 

दरम्यान, भगतसिंग नगर परिसरात राहणारा अरमान सलीम शेख (२५) हा तरुण देखील याच अमली पदार्थांच्या आहारी गेला होता. या परिसरात अमली पदार्थाची विक्री करणाऱ्या एका तरुणाकडे आरमान याने सुल्ली (सोलुशन) हा नशेचा पदार्थ मागितला. मात्र त्याला सोलुशन न मिळाल्याने तो घरी आला आणि त्याने रागाच्या भरात आपल्या घरातच गळफास घेऊन आत्महत्या केली. या प्रकरणानंतर अरमान याच्या आईने भगतसिंग नगर मध्ये अमली पदार्थांची विक्री करणाऱ्या व्यक्तीच्या विरोधात थेट आरोप केले असून त्याच्यावर कायदेशीर कारवाई करण्याची मागणी केली आहे. 

एवढेच नव्हे तर भगतसिंग नगर परिसरात मोठ्या प्रमाणात अमली पदार्थांची विक्री होत असल्याने या सर्व विक्री करणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्याची मागणी त्यांनी केली आहे. उघडपणे अमली पदार्थ मिळत असल्याने या परिसरातील निम्म्याहून अधिक लहान मुले आणि तरुण नशेच्या आहारी गेले आहेत. दरम्यान याबाबत अंबरनाथ पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र कोते यांना विचारले असता या परिसरात पोलिसांमार्फत नेहमी कारवाई केली जाते. मात्र त्या कारवाईदरम्यान कोणतेही अमली पदार्थ हाती लागत नसल्याची खंत व्यक्त केली.

Web Title: Youth commits suicide due to lack of drugs; Mother demands action against drug dealer

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.