पोलिसांनी मारहाण करून अपमान केल्यामुळे तरुणाने विष प्राशन करून केली आत्महत्या
By ऑनलाइन लोकमत | Published: August 3, 2021 04:58 PM2021-08-03T16:58:43+5:302021-08-03T17:10:05+5:30
Suicide Case :खाजगी काम करणारा महेश सोमवारी रात्री ७ च्या सुमारास घरासमोर उभा असताना त्याला बाजूला भांडण होताना दिसले.
नागपूर : क्षुल्लक कारणावरून पोलिसांनी सगळ्यांसमोर मारहाण करून अपमान केल्यामुळे दुखावलेल्या एका तरुणाने विष पिऊन आत्महत्या केली. हुडकेश्वर पोलिस ठाण्याच्या हद्दीत मंगळवारी सकाळी ही घटना घडली. त्यामुळे परिसरात दिवसभर प्रचंड तणाव होता. महेश शालिकराम राऊत असे आत्महत्या करणाऱ्या तरुणाचे नाव आहे. तो सोमवारी पेठ कॉर्टर परिसरात राहत होता.
खाजगी काम करणारा महेश सोमवारी रात्री ७ च्या सुमारास घरासमोर उभा असताना त्याला बाजूला भांडण होताना दिसले. त्यामुळे सुजाण नागरिकांच्या भूमिकेतून महेशने पोलीस नियंत्रण कक्षाला माहिती दिली. नियंत्रण कक्षाने हुडकेश्वर परिसरातील चार्लीला कळविले. त्यानुसार त्या भागात गस्तीवर असलेले बीट मार्शल आणि चार्ली तिकडे पोहोचले. नियंत्रण कक्षातून मिळालेल्या माहितीच्या आधारे त्यांनी महेश च्या मोबाईल नंबरवर संपर्क केला. तिकडे बॅटरी डाउन झाल्यामुळे महेशने मोबाईल चार्जिंग वर लावला होता. त्यामुळे बीट मार्शलने वारंवार संपर्क करूनही महेश जवळ मोबाईल नसल्याने तो प्रतिसाद देऊ शकला नाही. बीट मार्शलने ट्रू कॉलरवर मोबाईल धारकाचे नाव वाचले आणि त्याचा पत्ता शोधत ते महेशच्या घरासमोर पोहोचले. तेथे कोणतेही झगडा भांडण पोलिसांना दिसले नाही. महेशने जाणीवपूर्वक पोलिसांना त्रास देण्यासाठी नियंत्रण कक्षात फोन करून खोडसाळपणा केला, असा बीट मार्शलचा गैरसमज झाला. त्यामुळेच तो फोन उचलत नसावा, असाही अंदाज बीट मार्शलने बांधला. त्यामुळे घरासमोर पोहोचताच त्यांनी महेशला जाब विचारणे सुरु केले. शेजाऱ्यांसमोर त्याला मारहाणही केली. पोलिसांनी नाहक इतरांसमोर मारहाण करून अपमान केल्याची भावना महेशला अस्वस्थ करून गेली. त्या स्थितीत त्याने मध्यरात्रीनंतर विष प्राशन केले. ते लक्षात आल्यामुळे घरच्यांनी त्याला मेडिकलमध्ये नेले. तेथे डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. पोलिसांनी मारहाण केल्यामुळेच महेश राऊतने आत्महत्या केल्याची वार्ता परिसरात वायूवेगाने पसरली. त्यामुळे नागरिकांच्या भावना तीव्र झाल्या. संतप्त जमाव हुडकेश्वर पोलीस ठाण्यावर धडकला. त्यांनी दोषी पोलिसांवर तात्काळ कडक कारवाई करण्याची मागणी करून घोषणाबाजी सुरू केली. मोठ्या प्रमाणावर नागरिक जमा झाल्याने वातावरण चिघळण्याचे संकेत मिळाले. त्यामुळे वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांनी तिकडे धाव घेतली. आजूबाजूच्या पोलीस ठाण्यातूनही मोठा पोलीस बंदोबस्त मागवून घेण्यात आला. वृत्त लिहिस्तोवर हुडकेश्वर परिसरात प्रचंड तणावाचे वातावरण होते. दोषी पोलिसांची नावेही स्पष्ट झाली नव्हती.