नागपूर: पोलिसांच्या बेदम मारहाणीमुळे तरुणाचा मृत्यू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 7, 2021 11:27 PM2021-07-07T23:27:29+5:302021-07-07T23:29:02+5:30
मद्यपी तरुणाची दुचाकी वाहनावर धडकल्यामुळे संतप्त झालेल्या पोलिसांनी त्याला बेदम मारहाण केली. त्यामुळे त्या तरुणाचा मृत्यु झाला.
पारडी परिसरात तणाव : संतप्त नातेवाईक, नागरिकांची दोषींवर कारवाईची मागणी
लोकमत न्युज नेटवर्क
नागपूर : मद्यपी तरुणाची दुचाकी वाहनावर धडकल्यामुळे संतप्त झालेल्या पोलिसांनी त्याला बेदम मारहाण केली. त्यामुळे त्या तरुणाचा मृत्यु झाला. पारडी पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडलेल्या या घटनेमुळे निर्माण झालेला तणाव मध्यरात्रीपर्यंत पारडी परिसरात प्रचंड तणाव कायम होता. त्यामुळे शहरातील अनेक वरिष्ठ पोलीस अधिकारी पारडीच्या भवानी हॉस्पिटलमध्ये पोहोचले होते.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, बुधवारी रात्री ९ वाजताच्या सुमारास पारडी परिसरात मनोज ठवकर नामक तरुणाची दुचाकी पोलिसांच्या गस्ती वाहनावर धडकली. त्यामुळे संतप्त झालेल्या पोलिसांनी ठवकरला बेदम मारहाण केली. आधीच मद्य प्राशन करून असलेल्या ठवकरची प्रकृती यामुळे अस्वस्थ झाली. तो निपचित पडल्याचे पाहुन पोलीस हादरले. त्यांनी त्याला भवानी हॉस्पीटलमध्ये दाखल केले. तेथे डॉक्टरांनी ठवकरला मृत घोषित केले.
या घटनेचे वृत्त परिसरात कळताच सर्वत्र प्रचंड खळबळ उडाली. मोठ्या प्रमाणावर नागरिक आणि ठवकरचे नातेवाईक भवानी हॉस्पीटलमध्ये पोहोचले. पोलिसांच्या मारहाणीमुळे ठवकरचा मृत्यु झाल्याचा आरोप करुन त्यांनी तेथे घोषणाबाजी सुरु केली. जमाव हजाराच्या संख्येत होता. त्यामुळे प्रचंड तणाव निर्माण झाला. ही माहिती कळताच पोलीस दलातील बहुतांश वरिष्ठ पोलीस अधिकारी हॉस्पीटलमध्ये पोहोचले. त्यांनी कसेबसे जमावाला शांत करण्याचा प्रयत्न केला.
मात्र ठवकरचा मृत्यु पोलिसांच्या मारहाणीमुळे झाला त्यामुळे त्यांना तातडीने अटक करा, अशी मागणी करून जमावाने पोलिसांच्या नावाने शिमगा केला. तणाव वाढत असल्याचे पाहून आजुबाजुच्या पोलीस ठाण्यातील अतिरिक्त पोलीस ताफा तसेच शिघ्र कृती दलाचे जवान हॉस्पीटलमध्ये बोलवून घेण्यात आले. वृत्त लिहिस्तोवर कोणत्याही पोलीस अधिकाऱ्यांनी याबाबत माहिती देण्याचे टाळले होते.