सेल्फी काढताना विसरला देहभान; मागून वेगाने मालगाडी येत होती, रेल्वेने हॉर्न वाजवला अन्...
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 20, 2021 08:42 IST2021-05-20T08:41:51+5:302021-05-20T08:42:24+5:30
मंगळवारी दुपारी शोएब आणि त्याचे चार ते पाच मित्र चिकलठाणा रेल्वेस्थानक परिसरात फिरायला गेले होते.

सेल्फी काढताना विसरला देहभान; मागून वेगाने मालगाडी येत होती, रेल्वेने हॉर्न वाजवला अन्...
औरंगाबाद : प्लॅटफॉर्मवर उभे राहून धावत्या रेल्वे मालगाडीसोबत सेल्फी काढताना तोल गेल्यामुळे पडलेल्या तरुणाचा रेल्वेच्या धक्क्याने मृत्यू झाल्याची घटना मंगळवारी दुपारी ३ वाजता चिकलठाणा रेल्वेस्टेशन येथे घडली.
शेख शोएब शेख महेबूब (२०, रा. पटेलनगर, चिकलठाणा) असे मयताचे नाव आहे. मंगळवारी दुपारी शोएब आणि त्याचे चार ते पाच मित्र चिकलठाणा रेल्वेस्थानक परिसरात फिरायला गेले होते. शोएब हा मोबाईलवर सेल्फी काढत होता. मालवाहू रेल्वेगाडी येत असल्याचे त्यांना दिसले. शोएब प्लॅटफॉर्मवर उभा राहिला आणि धावणाऱ्या रेल्वेसोबत मोबाईलवर सेल्फी काढू लागला.
हॉर्न वाजवित गाडी रेल्वेस्थानकातून जात असताना अचानक तोल जाऊन तो रेल्वेच्या दिशेने पडला. या घटनेत त्याच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली आणि एक पाय तुटला. उपचारासाठी नेत असताना वाटेतच त्याने शेवटचा श्वास घेतला.