दरड कोसळल्याने युवकाचा जागीच मृत्यू: कांदाटी खोऱ्यात घडला प्रकार
By दीपक शिंदे | Published: October 21, 2022 10:10 AM2022-10-21T10:10:28+5:302022-10-21T10:10:58+5:30
परतीच्या पावसाने कांदाटी खोऱ्यात अक्षरशः धुमाकूळ घातला असून विजांचा कडकडाट,ढगांच्या गडगडाटात येथे जोरदार पाऊस कोसळत आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
बामणोली: महाबळेश्वर तालुक्यातील अतिदुर्गम अशा कांदाटी खोऱ्यातील पर्वत मधील मंगेश धोंडीबा ढेबे (वय १८) या युवकाचा दरड कोसळल्याने जागीच मृत्यू झाला. ही घटना गुरुवारी (दि.२०) घडली.
याबाबत अधिक माहिती अशी की, गेल्या दहा दिवसांपासून परतीच्या पावसाने कांदाटी खोऱ्यात अक्षरशः धुमाकूळ घातला असून विजांचा कडकडाट,ढगांच्या गडगडाटात येथे जोरदार पाऊस कोसळत आहे. गुरुवारीही वादळी वाऱ्यासह पाऊस सुरू होता. मुसळधार पाऊस सुरू असताना गुरे चारायला गेलेल्या युवकावर अचानक दरड कोसळल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला.
या परिसरात सातत्याने दरडी कोसळण्याचे प्रमाण मोठ्या प्रमाणात आहे. या दुर्दैवी घटनेत पर्वत ग्रामस्थांचा आक्रोश हृदय पिळवटून टाकणारा होता.