तरुणाई सापडते ड्रग्जच्या विळख्यात...; MDसह ट्रामाडॉल सेवनाकडील ओढा चिंताजनक

By ऑनलाइन लोकमत | Published: December 5, 2022 07:35 AM2022-12-05T07:35:16+5:302022-12-05T07:36:08+5:30

सीमेपलीकडून, समुद्रमार्गे, तसेच हवाईमार्गे येणाऱ्या ड्रग्जचा पुरवठा रोखण्यासाठी प्रयत्न होत आहेत. मात्र, तरुणाईने वेळीच सावध होत यापासून दूर होणे गरजेचे आहे. ड्रग्जला ‘नाही’ म्हणून आयुष्याला ‘हो’ म्हणणे गरजेचे आहे. कारण ही नशा तात्पुरत्या स्वरूपाची असून, तुमचे आयुष्य उद्ध्वस्त करते.  

Youth finds itself in the thick of drugs...; The risk of tramadol intake with MD is alarming | तरुणाई सापडते ड्रग्जच्या विळख्यात...; MDसह ट्रामाडॉल सेवनाकडील ओढा चिंताजनक

तरुणाई सापडते ड्रग्जच्या विळख्यात...; MDसह ट्रामाडॉल सेवनाकडील ओढा चिंताजनक

googlenewsNext

अमित घावटे, मुंबई विभागीय संचालक, एनसीबी

पाश्चात्त्य संस्कृतीच्या वाढत्या प्रभावामुळे मुंबईकरांच्या जीवनशैलीत बराच बदल झाला आहे. त्यातच आई-वडील आणि मुलांमधील संवाद तुटत चालल्याने आपली मुले काय करतात, ती कोणाच्या संगतीत आहेत, याची पुसटशीही कल्पना पालकांना नसते. आई-वडील, पालक फक्त मुलांना लागेल तसा पॉकेटमनी पुरवतात. आई-वडिलांशी संवाद हरवलेली मुले एकलकोंडी बनून व्यसनांकडे वळत असल्याचे विदारक वास्तव वाढलेल्या अमली पदार्थविरोधी कारवायांतून समोर आले आहे.

पाश्चात्त्य जीवनशैली अंगीकारत एन्जॉयमेंटच्या चुकीच्या कल्पना मनात धरून तरुणाई ड्रग्जच्या विळख्यात अलगदपणे अडकत आहे. हेरॉईन, कोकेन, ब्लॅक कोकेनसारख्या घातक ड्रग्जच्या जोडीला तरुणाईचा मेडिकल नशेकडे कल वाढत आहे. एमडीसह  ट्रामाडॉल गोळ्यांच्या सेवनाकडे वाढणारा ओढा चिंताजनक आहे. पान सुपारीद्वारे एमडीचे सेवन होताना दिसते. एका आंतरराष्ट्रीय सिंडिकेटने मुंबईहून यूएसएला कुरिअर पार्सलद्वारे ट्रामाडॉल गोळ्यांची अवैध तस्करी करण्याची योजनाही एनसीबीने उधळून लावली. 

दुसरीकडे जेथे लॉकडाऊनच्या काळात सर्व बंद होते, तेथेच या मंडळींना डार्क वेबमुळे एका क्लिकवर घरपोच ड्रग्जचा पुरवठा होत आहे. तोही हव्या तशा स्वरूपात. डार्क वेबमुळे तरुणाईला थ्रीलबरोबर काही तरी नवीन अनुभवायला, करायला मिळते म्हणून या मंडळींची याभोवती वाढणारी गर्दी चिंताजनक ठरत आहे. टेक्नोसॅव्ही तरुणाई, हायप्रोफाइल मंडळी पोलिस कारवाईत अडकू नये म्हणून डार्क वेबचा आधार घेतात, हेदेखील वेळोवेळी कारवाईतून समोर आले आहे. त्यामुळे त्याचा माग घेण्याचे आव्हान आहे. पारंपरिक पद्धतीने पिकविल्या जाणाऱ्या गांजाची मागणी जास्त आहे. आंध्र, ओडिशा सीमेलगतच्या भागातून हा सहज उपलब्ध होतो. वेळोवेळी तीदेखील साखळी एनसीबीने तोडण्याचा प्रयत्न केला आहे.

कोडेनमिश्रित कफ सीरपचे संकट वाढत आहे. धारावी, मानखुर्दसारख्या ठिकाणी याचा वापर मोठ्या प्रमाणात होताना दिसत आहे. अजमेर, वाराणसी भागातून याचा पुरवठा होतो. आतापर्यंत हजारो बाटल्या एनसीबीने जप्त करत वाराणसीमधली मोठी साखळी उद्ध्वस्त केली आहे. सीमेपलीकडून येणाऱ्या ड्रग्ज तसेच दहशतवादी कारवायांसाठी दहशतवादीदेखील याकडे वळत आहेत. त्यामुळे नार्को दहशतवादाचे मोठे संकट देशासमोर आहे. आतापर्यंतच्या कारवाईत इसिसपर्यंतचे रॅकेट उद्ध्वस्त केले आहे. तसेच गेल्या काही दिवसांत कुरिअरद्वारे तस्करीचा ट्रेंड वाढला आहे. 

Web Title: Youth finds itself in the thick of drugs...; The risk of tramadol intake with MD is alarming

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.