उच्च शिक्षणासाठी आर्थिक परिस्थिती नसल्याने युवकाची आत्महत्या
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 24, 2019 19:45 IST2019-12-24T19:38:08+5:302019-12-24T19:45:35+5:30
एका १९ वर्षीय युवकाने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना हासेगाववाडी (ता. औसा) येथे घडली.

उच्च शिक्षणासाठी आर्थिक परिस्थिती नसल्याने युवकाची आत्महत्या
औसा (जि. लातूर) - सततची दुष्काळी परिस्थिती आणि यंदा परतीच्या पावसामुळे शेतीतून अपेक्षित उत्पन्न निघाले नाही. त्यामुळे वडील उच्च शिक्षणासाठी पैसे देऊ शकत नसल्याने निराश झालेल्या एका १९ वर्षीय युवकाने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना हासेगाववाडी (ता. औसा) येथे घडली. याप्रकरणी औसा पोलीस ठाण्यात मंगळवारी नोंद करण्यात आली आहे. बळीराम ऊर्फ पोपट भानुदास सुरवसे (१९ रा. हासेगाववाडी) असे आत्महत्या केलेल्या युवकाचे नाव आहे.
पोलिसांनी सांगितले, हासेगाववाडी येथील भानुदास सुरवसे यांना चार एकर कोरडवाहू शेती आहे. कुटुंबात पत्नी, दोन मुले, एक मुलगी आहे. ते शेतीबरोबर मेंढी पालन करुन कुटुंबाचा उदरनिर्वाह करतात. गेल्या तीन-चार वर्षांपासून सतत दुष्काळ आणि यंदा परतीच्या पावसामुळे शेती उत्पन्नात घट झाली. त्यामुळे कुटुंबाची आर्थिक परिस्थिती नाजूक झाली.
इयत्ता १२ वीपर्यंतचे शिक्षण घेतलेल्या बळीरामला कुटुंबियांनी पुढील शिक्षणाचा खर्च आम्हास झेपणार नाही, असे सांगितले. त्यामुळे चिंताग्रस्त झालेल्या बळीराम सुरवसे याने सोमवारी सायंकाळी घरातील पत्र्याच्या आडूला गळफास घेऊन आत्महत्या केल्याचे पोलिसांनी सांगितले. याप्रकरणी औसा पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.