रेल्वेच्या धडकेत तरुणाचा मृत्यू; मृतदेहावर दोन कुटुंबांचा दावा, पोलीसही झाले हैराण
By ऑनलाइन लोकमत | Published: January 9, 2024 07:59 PM2024-01-09T19:59:51+5:302024-01-09T20:02:59+5:30
हा तरुण आमच्या कुटुंबातील असल्याचं सांगत आणखी काही लोकं पोलिसांकडे पोहोचली.
रेल्वेच्या धडकेत तरुणाचा मृत्यू झाल्यानंतर विचित्र प्रकार घडला आहे. पोलिसांनी सदर तरुणाचा मृतदेह ताब्यात घेऊन शवागारात ठेवला. तीन दिवस उलटून गेल्यानंतरही कोणीही हा मृतदेह ताब्यात घेण्यास आलं नाही. मात्र चौथ्या दिवशी एक कुटुंब काही कागदपत्रे घेऊन आलं आणि त्यांनी सदर तरुण आपल्या कुटुंबातील असल्याचं सांगितलं. त्या कुटुंबाने मृतदेहावर अंत्यसंस्कारदेखील केले. परंतु आता आणखी एक कुटुंब शवागारात आलं असून त्या तरुणाचे आम्ही पालक असल्याचा दावा केला आहे. उत्तर प्रदेशातील इटावा येथील या सर्व प्रकाराने पोलीसही हैराण झाले आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, फ्रेंड्स कॉलनी परिसरातील महरा फाटक इथं एका अज्ञात तरुणाचा रेल्वेच्या धडकेत मृत्यू झाल्याची घटना घडली. याबाबतची माहिती स्थानिकांकडून मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली आणि मृतदेह ताब्यात घेतला. सदर तरुणाची ओळख न पटल्याने पोलिसांनी मृतदेह शवागारात ठेवला. घटनेच्या तीन दिवसांनंतर एका कुटुंबाने तिथं येत मृतदेहावर दावा सांगितला आणि मृतदेह घेऊन जात त्याच्यावर अंत्यसंस्कार केले.
तरुणावर अंत्यसंस्कार झाल्यानंतर नवा वाद निर्माण झाला. कारण हा तरुण आमच्या कुटुंबातील असल्याचं सांगत आणखी काही लोकं पोलिसांकडे पोहोचली. या लोकांकडील कागदपत्रांची तपासणी केल्यानंतर मृत तरुणाचे नाव सत्यवीर राजपूत असं असल्याचं स्पष्ट झालं. या तरुणाचे वय ४० वर्ष इतकं असून तो मानसिकदृष्ट्या अस्थिर होता, अशीही माहिती त्याच्या कुटुंबीयांनी दिली.
दरम्यान, एकाच तरुणाबाबत दोन कुटुंबीयांनी दावे केल्याने पोलिसांसमोर संभ्रम निर्माण झाला. याप्रकरणी पोलिसांकडून अधिक तपास केला जात आहे.