धक्कादायक! लॉकडाऊनमध्ये दुरावलेल्या मैत्रिणीसोबत मित्रानं जवळीक साधल्यानं गळा दाबून हत्या
By ऑनलाइन लोकमत | Published: February 10, 2021 04:35 AM2021-02-10T04:35:55+5:302021-02-10T08:11:20+5:30
नाशिक येथून दोघांना अटक; दौघांपैकी एक अल्पवयीन
नवी मुंबई : लॉकडाऊनमुळे दुरावलेल्या मैत्रिणीसोबत जवळीक वाढवणाऱ्या मित्राचीच हत्या केल्याची घटना उघडकीस आली आहे. मृत मुलगा चार दिवसांपासून बेपत्ता असल्याने त्याचा शोध घेत असताना पोलिसांना गुन्ह्याचा उलगडा झाला. याप्रकरणी नाशिक येथून दोघांना अटक करण्यात आली असून, त्यात एक अल्पवयीन आहे.
तळवली येथून अनिल शिंदे (१९) हा ५ फेब्रुवारीला सकाळी बेपत्ता झाला होता. याप्रकरणी तक्रार प्राप्त होताच पोलिसांनी गांभीर्याने तपासाला सुरुवात केली होती. पोलिसांनी त्याच्या फोनवरील शेवटचे संपर्क शोधले असता नाशिक येथील एका तरुणाची माहिती समोर आली. यानुसार उपायुक्त सुरेश मेंगडे, सहायक आयुक्त विनायक वस्त यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ निरीक्षक योगेश गावडे यांनी पथक तयार केले होते. त्यामध्ये निरीक्षक शिरीष पवार, उपनिरीक्षक उमेश गवळी आदींचा समावेश होता. त्यांनी नाशिक येथून अनिकेत जाधव (१९) याला ताब्यात घेतले होते. चौकशीसाठी त्याला पोलिस ठाण्यात आणले असता, त्याने अनिलची हत्या केल्याची कबुली दिली. त्यानुसार सोमवारी रात्री त्याने दाखवलेल्या ठिकाणावरून अनिलचा मृतदेह ताब्यात घेतला. घणसोली गावालगतच्या झाडीत हा मृतदेह टाकला होता. चार दिवसांपासून त्याठिकाणी त्याचा मृतदेह पडून होता. या गुह्यात त्याला साथ देणाऱ्या एका अल्पवयीन मुलाला ताब्यात घेऊन बालसुधारगृहात रवानगी करण्यात आली आहे.
अशी घडली घटना
अनिकेत हा पूर्वी तळवली परिसरात राहायला होता. त्यावेळी एका मुलीसोबत त्याची घनिष्ट मैत्री होती; परंतु लॉकडाऊनमध्ये तो गावी गेल्यानंतर त्यांच्यात दुरावा निर्माण झाला होता.
याचवेळी अनिलची त्या मुलीसोबत झालेली मैत्री अनिकेतला खटकत होती. यावरून त्याने साथीदारासह नाशिक येथे येऊन अनिलची हत्या करून पळ काढला होता. ५ फेब्रुवारीला दोघेही घणसोलीत आले असता त्यांनी एका व्यक्तीच्या मोबाइलवरून अनिलला फोन करून बोलावले. यानंतर त्याला दारू पाजल्यानंतर कोयत्याने वार करून हत्या केली होती.