गुगलवरील ठगामुळे तरुणाने गमावले १ लाख
By ऑनलाइन लोकमत | Published: May 11, 2019 02:30 AM2019-05-11T02:30:03+5:302019-05-11T02:31:35+5:30
गुगलवरील ठगामुळे साकिनाका येथील तरुणाने एक लाख रुपये गमावले. साकिनाका पोलीस आरोपीचा शोध घेत आहेत.
मुंबई : गुगलवरील ठगामुळे साकिनाका येथील तरुणाने एक लाख रुपये गमावले. साकिनाका पोलीस आरोपीचा शोध घेत आहेत.
चांदीवलीतील रहिवासी असलेले अनिल सिंग (२४) यांनी नुकताच एका फायनान्स कंपनीमधून मोबाइल घेतला. मोबाइलचे किती हफ्ते कपात झाले? हे पाहण्यासाठी त्यांनी गुगलवरून फायनान्स कंपनीच्या प्रतिनिधींचा मोबाइल क्रमांक मिळवला. त्या वेळी समोरच्या व्यक्तीने तुमचे जीएसटीसह इंन्शुरन्सचे पैसे कापले जात असल्याचे सांगितले. त्यामुळे सिंगला धक्का बसला. पुढे, संबंधित तरुणाने मोबाइलचे हफ्ते बंद करण्याच्या नावाखाली त्याला ‘गुगल पे’वरून रिक्वेस्ट पाठवली. त्याने सांगितल्याप्रमाणे सिंगने ती स्वीकारली.
त्याच दरम्यान त्याच्या खात्यातून सुरुवातीला २० हजार, त्यापाठोपाठ २५ हजार, पुढे आणखी ५० हजार रुपये काढल्याचा संदेश धडकला. या प्रकारामुळे सिंगचा गोंधळ उडाला. आणखी ५ हजार रुपये गेले. असे एकूण १ लाख रुपये काढण्यात आले.
त्यानंतर, संबंधिताने मोबाइल बंद केला. फसवणूक झाल्याचे लक्षात येताच, सिंगने पोलिसांत धाव घेत तक्रार दिली. त्यानुसार, साकिनाका पोलीस अधिक तपास करीत आहेत.