नागपुरात बेदम मारहाण करून युवकाची हत्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 11, 2020 09:24 PM2020-03-11T21:24:17+5:302020-03-11T21:27:06+5:30
आईला शिवीगाळ करण्यास मनाई केल्यामुळे एका युवकाला बेदम मारहाण करून जिवे मारल्याची घटना शांतीनगर ठाण्यांतर्गत घडली.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : आईला शिवीगाळ करण्यास मनाई केल्यामुळे एका युवकाला बेदम मारहाण करून जिवे मारल्याची घटना शांतीनगर ठाण्यांतर्गत घडली.
सागर खुशाल डाबरे (२६) असे मृताचे नाव आहे. तर आरोपी वीरू गुणवंत चांदेकर (३२) रा. लालगंज हा आहे. सागर किराणा दुकानात काम करीत होता. त्याच्या कुटुंबात आई आणि लहान भाऊ आहे. सागरच्या आईची मानसिक स्थिती ठीक नाही. त्याने दोन महिन्यांपूर्वी शांतीनगर पोलिसांच्या मदतीने आपल्या आईला मनोरुग्णालयात भरती केले होते. काही दिवसांनंतर त्याच्या आईला मनोरुग्णालयातून सुटी मिळाली. ९ मार्चला दुपारी वीरूने सागरला त्याच्या आईवरून शिवीगाळ करून अपशब्द वापरले. त्याने सागरला धमकीही दिली. यामुळे दोघांमध्ये वाद निर्माण झाला. सागरने आईला शिवीगाळ करून अपशब्द वापरण्यास मनाई केली. यामुळे वीरूने त्यास लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. सागरने स्वत:ला वाचविण्यासाठी प्रयत्न केले. परंतु मारहाणीत सागरला गंभीर दुखापत झाली. वस्तीतील नागरिकांनी सागरला खासगी रुग्णालयात पोहोचविले. तेथे त्यास मृत घोषित करण्यात आले. शांतीनगर पोलिसांनी सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करून वीरूला अटक केली आहे. या घटनेमुळे सागरच्या कुटुंबाला मोठा धक्का बसला आहे. त्याची आई मनोरुग्ण असून भाऊ मजुरी करतो. त्यांची देखभाल करणारा कुटुंबात कोणीच नाही. किरकोळ वादातून वीरूने त्याला मारहाण केली. मारहाणीमुळे सागरच्या चेहरा, डोके, छाती आणि पोटावर गंभीर जखमा झाल्यामुळे त्याचा मृत्यू झाल्याची माहिती आहे.