ऑनलाईन जुगाराचे कर्ज फेडण्यासाठी तरुणाने केली सोनसाखळीची चोरी
By ऑनलाइन लोकमत | Published: October 5, 2023 05:00 PM2023-10-05T17:00:54+5:302023-10-05T17:01:04+5:30
ठाण्याच्या नौपाडा येथे राहणाऱ्या पुष्पाबेन हरीलाल वोरा (७४) या त्यांची मुलगी पायल हिच्या टाकी रोड येथील घरी २५ सप्टेंबरला रात्री आठ वाजण्याच्या सुमारास जैन धर्मियांचा कार्यक्रम आटोपल्यानंतर जात होत्या.
मंगेश कराळे
नालासोपारा :- मोबाईलवर ऑनलाईन जुगार खेळताना झालेल्या कर्जाचे ओझे कमी करण्यासाठी वयोवृद्ध महिलेच्या गळ्यातून सोनसाखळीची जबरी चोरी करणाऱ्या आरोपीला तरुणाला अटक करण्यात आली आहे. इमारतीमध्ये लावण्यात आलेल्या सीसीटीव्हीमूळे गुन्ह्याची उकल करण्यात गुन्हे शाखेच्या युनिट तीनच्या पोलिसांना यश मिळाले आहे.
ठाण्याच्या नौपाडा येथे राहणाऱ्या पुष्पाबेन हरीलाल वोरा (७४) या त्यांची मुलगी पायल हिच्या टाकी रोड येथील घरी २५ सप्टेंबरला रात्री आठ वाजण्याच्या सुमारास जैन धर्मियांचा कार्यक्रम आटोपल्यानंतर जात होत्या. यावेळी इमारतीच्या परिसरात पायी चालत असताना पाठीमागून आलेल्या आरोपीने त्यांच्या गळ्यातील २५ ग्रॅम वजनाची ७० हजार रुपये किमतीची सोनसाखळी खेचून तो पळून गेला होता. याप्रकरणी २६ सप्टेंबरला तुळींज पोलिसांनी सोनसाखळी चोरीचा गुन्हा दाखल केला होता. या गुन्ह्याचा गुन्हे शाखेच्या युनिट तीनच्या पथकाने तपास सुरू केला. इमारतीमधील सीसीटीव्ही फुटेजच्या मदतीने आरोपी निष्पन्न करण्यास युनिट तीनला यश मिळाले आहे. भोईदापाड्याच्या झिंबलपाडा परिसरातील शिव मंदिराजवळ राहणाऱ्या आरोपी शिवकुमार दया शंकर पांडे (२४) याला ताब्यात घेतले. पुढील कारवाईसाठी ३ ऑक्टोबरला तुळींज पोलिसांना ताब्यात दिले आहे. मिळालेल्या माहितीनुसार मोबाईलवर ऑनलाईन जुगार खेळण्याची त्याला खूप सवय होती. त्याच्यावर अडीच लाख रुपयांचे कर्ज झाल्याने त्याने चेन स्नॅचिंग केली आहे.
वरील कामगिरी पोलीस उपायुक्त (गुन्हे) अविनाश अंबुरे, सहाय्यक पोलीस आयुक्त अमोल मांडवे यांचे मार्गदर्शनाखाली युनिट तीनचे पोलीस निरीक्षक प्रमोद बडाख, पोलीस उपनिरीक्षक अभिजित टेलर, उमेश भागवत, पोलीस हवालदार अशोक पाटील, मनोज चव्हाण, मुकेश तटकरे, सचिन घेरे, सागर बारवकर, मनोज सकपाळ, अश्विन पाटील, राकेश पवार, सुमित जाधव, सुनिल पाटील, युवराज वाघमोडे म.सु.ब. प्रविण वानखेडे, सागर सोनवणे, गणेश यादव यांनी केली आहे.