नागपुरात अपहरण करून युवकाला लुटले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 17, 2020 01:24 AM2020-07-17T01:24:44+5:302020-07-17T01:26:34+5:30
प्रियकरासोबत पळालेल्या पत्नीची पोलिसात तक्रार केल्यामुळे चिडलेल्या प्रियकराने आपल्या हस्तकामार्फत तक्रारकर्त्या युवकाचे अपहरण केले. मारहाण करून जवळील १० हजाराची रक्कम हिसकावल्याची घटना घडली.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : प्रियकरासोबत पळालेल्या पत्नीची पोलिसात तक्रार केल्यामुळे चिडलेल्या प्रियकराने आपल्या हस्तकामार्फत तक्रारकर्त्या युवकाचे अपहरण केले. मारहाण करून जवळील १० हजाराची रक्कम हिसकावल्याची घटना घडली. या प्रकरणी, इमामवाडा पोलिसांनी समीर सिंह आणि त्याच्या तीन साथीदारांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. ही घटना इमाममवाडा परिसरातील अशोक चौकात घडली.
या घटनेतील तक्रारकर्ता ४० वर्षीय युवक अजनी पोलीस ठाण्याच्या परिसरात राहतो. त्याची पत्नी २४ मार्चला गोधनी येथील नीतेश बागडे याच्यासोबत पळून गेली होती. या संदर्भात त्याने पोलिसात तक्रार केली होती. हा युवक फायर उपकरण लावण्याचे काम करतो. १३ जुलैच्या दुपारी समीर सिंह नामक व्यक्तीने त्याला कॉल करून ६ किलोचे पाच सिलिंडर लावण्याचे काम दिले. समीरने दिलेल्या पत्त्यावर तो आपल्या बाईकने अशोक चौकात पोहचला. तिथे समीर आपल्या साथीदारांसह कारमध्ये बसलेला होता. फायर उपकरण लावण्यासाठी कारमध्ये बसून फ्लॅटवर जाऊ असे त्याने सांगितले. त्यामुळे तो त्यांच्यासोबत बेलतरोडी पोलीस स्टेशनच्या हद्दीतील एका फ्लॅटमध्ये गेला. किचन दाखविण्याच्या बहाण्याने त्याला आत नेऊन बंद करण्यात आले. चाकूच्या धाकावर मारहाण केली.
नीतेश बागडे आणि त्याच्यासोबत पळून गेलेल्या पत्नीची तक्रार का केली, असे विचारत मारहाण केली. त्यानंतर त्याच्याजवळील १० हजार रुपये हिसकावून सोडून देण्यात आले. पीडित युवकाने बुधवारी पोलिसात तक्रार केली. या प्रकरणी मारहाण करणे, लुटणे, कट रचणे अशा गुन्ह्यांची कलमे लावण्यात आली. नीतेशच्या इशाऱ्यावरूनच हा प्रकार करण्यात आला असावा, असा पोलिसांचा संशय आहे. या युवकाचे लग्न २०१२ मध्ये झाले होते.