युवकाला एक महिना ठेवले डांबून; प्रेमप्रकरणातून अपहरण करणाऱ्या चौघांना कारावास

By ऑनलाइन लोकमत | Published: March 24, 2021 07:33 PM2021-03-24T19:33:02+5:302021-03-24T19:34:06+5:30

Kidnapping : या गुन्ह्यातील चार आरोपींना जिल्हा सत्र न्यायालयाने बुधवारी तीन वर्ष कारावासाची शिक्षा ठोठावली. 

The youth was kept for a month; Four kidnapped in love affair jailed | युवकाला एक महिना ठेवले डांबून; प्रेमप्रकरणातून अपहरण करणाऱ्या चौघांना कारावास

युवकाला एक महिना ठेवले डांबून; प्रेमप्रकरणातून अपहरण करणाऱ्या चौघांना कारावास

Next
ठळक मुद्देचंद्रजीत सुभाषचंद्र रुमाले, आशिष गजानन भवरासे, शक्ती रामदास गुल्हाने, संजय विष्णू गुल्हाने या चौघांना तीन वर्ष कारावास व दंडाची शिक्षा झाली आहे.

यवतमाळ : प्रेम असल्याच्या संशयावरून दारव्हा तालुक्यातील युवकाला चार जणांनी अपहरण करून तब्बल एक महिना डांबून ठेवले. त्याच्या या काळात अमानुष छळ करण्यात आला. या गुन्ह्यातील चार आरोपींना जिल्हा सत्र न्यायालयाने बुधवारी तीन वर्ष कारावासाची शिक्षा ठोठावली. 

चंद्रजीत सुभाषचंद्र रुमाले, आशिष गजानन भवरासे, शक्ती रामदास गुल्हाने, संजय विष्णू गुल्हाने या चौघांना तीन वर्ष कारावास व दंडाची शिक्षा झाली आहे. या आरोपींनी अरुण विष्णूपंत सरतांबे रा. दारव्हा या युवकाचे १३ मे २०१२ रोजी यवतमाळातील एका ट्रॅव्हल्सच्या कार्यालयातून अपहरण केले. आरोपी ओळखीचे असल्याने अरुण त्यांच्यासोबत गेला. अरुणला यवतमाळातील दत्तात्रय नगर परिसरातील एका घरात डांबून ठेवण्यात आले. १८ जुलै २०१२ पर्यंत अरुणचा अमानुष छळ करण्यात आला. अरुणने बंद घराची खिडकी उघडून परिसरातील नागरिकांना मदत मागितली. त्यानंतर परिसरातील नागरिकांनी त्याची सुटका केली. अवधूतवाडी पोलिसांनी अरुण सरतांबे याच्या तक्रारीवरून चंद्रजीत रुमाले, दिनेश तोष्णीवाल, विकी उर्फ अनिल विक्रम डहाके, तुषार सुखदेव गुल्हाने, रोशन विनायक गुल्हाने, आशिष गजानन भवरासे, शक्ती रामदास गुल्हाने, संजय विष्णू गुल्हाने यांच्याविरुद्ध भादंवि कलम ३०७, ३६४, ३४४, ३४६, ३६५, ३६८, ३५७ व सहकलम ३४ अंतर्गत गुन्हा नोंदविला. सहायक पोलीस निरीक्षक विजय राठोड यांनी गुन्ह्याचा तपास करून दोषारोपपत्र न्यायालयात दाखल केले.

प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश किशोर पेठकर यांनी या खटल्यात दहा साक्षीदार तपासले. यात पीडित व प्रत्यक्षदर्शी साक्षीदारांची साक्ष ग्राह्य मानून चार जणांना तीन वर्ष कारावास व प्रत्येकी ५०० रुपये दंडाची शिक्षा ठोठावली. यामध्ये ३६५ अंतर्गत तीन वर्ष सक्त मजुरी, ३६८ अंतर्गत सक्त मजुरी, ३४६ अंतर्गत एक वर्ष, ३२४ अंतर्गत एक वर्ष आणि ३५७ अंतर्गत सहा महिने शिक्षा सुनावली. ही सर्व शिक्षा आरोपींना एकत्रित भोगायची आहे. या खटल्यात सरकारी पक्षाच्यावतीने सहायक सरकारी वकील ॲड. अरुण ए. मोहोड, ॲड. सवीन तायडे, ॲड. रणजीत अगमे यांनी बाजू मांडली. त्यांना अवधूवाडी पोलीस ठाण्याचे पैरवी अधिकारी दिनकर चौधरी यांनी सहकार्य केले. पुराव्याअभावी दिनेश तोष्णीवाल, विक्की उर्फ अनिल डहाके, तुषार गुल्हाने यांंना निर्दोष सोडण्यात आले.

Web Title: The youth was kept for a month; Four kidnapped in love affair jailed

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.