देशी कट्टा विक्रीच्या बेतात असलेल्यांना ठोकल्या बेड्या
By महेश सायखेडे | Published: September 19, 2022 10:23 PM2022-09-19T22:23:01+5:302022-09-19T22:23:11+5:30
हिंगणघाट पोलिसांची कामगिरी : ३९ हजार रुपयांचा मुद्देमाल हस्तगत
वर्धा : गावठी बनावटीचा देशी कट्टा विक्रीच्या बेतात असलेल्यांना हिंगणघाट पोलिसांनी मोठ्या हुशारीने ताब्यात घेत अटक केली आहे. या प्रकरणातील आरोपींविरुद्ध हत्यार कायद्यान्वये गुन्ह्याची नोंद घेत त्यांच्याकडून एक देशी कट्टा व इतर साहित्य असा एकूण ३९ हजारांचा मुद्देमाल हस्तगत केला आहे. सोनू अंबादास सोनटक्के (२१) रा. घाटसावली व सूरज संजय करपे (२३) रा. हिंगणघाट असे अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत.
देशी कट्ट्याची विक्री करण्यासाठी दोन तरुण हिंगणघाट येथे येत असल्याची माहिती मिळताच हिंगणघाट पोलीस अलर्टमोडवर येत थेट ॲक्शन मोडवर आलेत. नांदगाव चौकात संशयितांच्या प्रतीक्षेत असलेले पोलिसांनी संशयित त्यांच्या डोळ्यांसमोर येताच त्यांना ताब्यात घेतले. पोलिसांनी ताब्यात घेतलेल्या सोनू सोनटक्के व सूरज करपे याची अंगझडती घेतली असता सोनू जवळ एक चालू स्थितीतील देशी कट्टा आढळून आला. तो पोलिसांनी जप्त करीत गुन्ह्यात वापरलेली दुचाकी असा एकूण ३९ हजारांचा मुद्देमाल जप्त केला. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक वसंत शुक्ला करीत असून ही कारवाई ठाणेदार के. एम. पुंडकर यांच्या मार्गदर्शनात गुन्हे शोध पथकाचे विवेक बनसोड, पंकज घोडे, प्रशांत वाटखेडे, उमेश बेले, आशिष गेडाम यांनी केली.