मॉडेल बनविण्याचे आमिष दाखवत तरुणाची फसवणूक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 2, 2018 04:58 AM2018-08-02T04:58:27+5:302018-08-02T04:58:38+5:30
एका बड्या मोबाइल कंपनीच्या जाहिरातीत मॉडेल म्हणून काम देण्याचे आमिष दाखवून फसवणूक करणाऱ्या निर्मात्याला पार्कसाईट पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. धवल जयंत व्यास (३२) असे आरोपीचे नाव आहे.
मुंबई : एका बड्या मोबाइल कंपनीच्या जाहिरातीत मॉडेल म्हणून काम देण्याचे आमिष दाखवून फसवणूक करणाऱ्या निर्मात्याला पार्कसाईट पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. धवल जयंत व्यास (३२) असे आरोपीचे नाव आहे.
विक्रोळीच्या पार्कसाईट परिसरात तक्रारदार तरुण राहण्यास आहे. त्याला एका तरुणीने संपर्क साधला. एका बड्या मोबाइल कंपनीच्या जाहिरातीत मॉडेल म्हणून काम देण्याबाबत चर्चा केली. पुढे निर्माता जयंत धवलला संपर्क साधण्यास सांगितले. त्याने धवलची भेट घेतली. तेव्हा, धवलने आर्टिस्ट कार्डसाठी १० हजार रुपये घेतले.
आर्टिस्ट कार्ड येताच तुझी निवड केली जाईल, असे सांगून तो नॉट रिचेबल झाला. त्यामुळे तरुणाने पार्कसाईट पोलीस ठाणे गाठून तक्रार दिली. पोलिसांनी गुन्हा दाखल करून धवलचा शोध सुरू केला.
धवल दहिसर येथील रहिवासी असल्याची माहिती मिळताच, पार्कसाईट पोलिसांनी त्याच्या घरी छापा मारला आणि त्याला बेड्या ठोकल्या. त्याने आईकडे दिलेली १० हजार रुपयांची रोकडही पोलिसांनी ताब्यात घेतली. तो खरेच निर्माता आहे का? त्याने आतापर्यंत अशा प्रकारे किती जणांची फसवणूक केली आहे? या प्रकरणी पार्क साईट पोलीस धवलकडे अधिक तपास करीत आहेत.