झोमॅटोच्या डिलिव्हरी बॉयकडून दोघींचा विनयभंग
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 28, 2019 05:57 AM2019-08-28T05:57:49+5:302019-08-28T05:59:45+5:30
घोडबंदर रोडवरील घटना : कोठडीत रवानगी
ठाणे : घोडबंदर रोड येथून स्कूटरवरून घरी जाणाऱ्या दोन महिलांचा विनयभंग करणाºया दोघांना कापूरबावडी पोलिसांनी सोमवारी रात्री अटक केली. हे दोघेही ‘झोमॅटो’ कंपनीचे डीलिवरी प्रतिनिधी आहेत. छोटेलाल सोनी (३५, रा. कोपरी, ठाणे), गजानन शिंदे (२९, रा. कळवा, ठाणे) अशी त्यांची नावे आहेत.
राबोडी येथे राहणारी महिला ही घोडबंदर रोडवरील एका रुग्णालयात आईच्या उपचारासाठी आली होती. २६ आॅगस्टला सायंकाळी ५.३०च्या सुमारास तिने आईला रिक्षात बसवले. त्यानंतर ती मैत्रिणीसमवेत स्कूटरवरून राबोडी येथे जात होती. त्या दोघी सेंट झेवियर्स स्कूलसमोरील ब्रह्मांड सिग्नलवर आल्या. तेव्हा त्यांच्या मागून आलेल्या मोटारसायकलवर मागे बसलेल्या शिंदेने त्यांना शिवीगाळ करून विनयभंग केला. तर मोटारसायकलस्वार छोटेलालनेही अश्लील भाषेत शिवीगाळ केली. शिंदेने मारहाणीसाठी हातही उगारला. तेंव्हा तिथे असलेल्या वाहतूक नियंत्रण शाखेच्या पोलिसांनी त्यांना अडविले. त्यांनी ठाणे शहर नियंत्रण कक्षाला याची माहिती दिल्याने कापूरबावडी पोलीस ठाण्याच्या बीट मार्शलनी तेथे तत्काळ धाव घेतली. वर्तकनगर विभागाचे सहायक पोलीस आयुक्त पंकज शिरसाठ यांच्या पथकाने त्या दोघांना रात्री ९ च्या सुमारास अटक केली. या दोघांनाही न्यायालयीन कोठडीत ठेवण्याचे आदेश ठाणे न्यायालयाने मंगळवारी दिले आहेत.
याआधीही असा प्रकार
नवी मुंबईत या कंपनीच्याच डिलिवरी करणाºया महिलेने वाहतूक नियंत्रण शाखेच्या पोलिसांना नो पार्किंगमधील दुचाकी टोर्इंग केल्याने अर्वाच्य भाषेत शिवीगाळ केली होती.