धक्कादायक! धाराशिवमध्ये दहावीच्या परीक्षेत गाेंधळ
By ऑनलाइन लोकमत | Published: March 6, 2023 06:11 PM2023-03-06T18:11:35+5:302023-03-06T18:11:47+5:30
धाराशिव शहरातील शरद पवार हायस्कूल येथे दहावी परीक्षेचे केंद्र आहे.
‘मराठी’च्या विद्यार्थ्यांना दिली इंग्रजी माध्यमाची प्रश्नपत्रिका...धाराशिव -दहावीच्या परीक्षेत शहरातील एका केंद्रावर मराठी माध्यमाच्या विद्यार्थ्यांना चक्क इंग्रजी माध्यमाची इंग्रजी विषयाची प्रश्नपत्रिका दिल्याचा धक्कादायक प्रकार साेमवारी समाेर आला. पेपरची वेळ संपल्यानंतर पालकांसह विद्यार्थ्यांत एकच गाेंधळ उडाला. पहिल्या पाच मिनिटांतच हा प्रकार काही विद्यार्थ्यांच्या लक्षात आला. त्यांनी परीक्षा हाॅलमधील गुरूजींना कल्पनाही दिली. परंतु, त्यांनी दखल घेतली नाही, असा आराेप विद्यार्थ्यांसह पालकांनी केला.
धाराशिव शहरातील शरद पवार हायस्कूल येथे दहावी परीक्षेचे केंद्र आहे. याच केंद्रातील हाॅल क्र. ४ मध्ये साेमवारी मराठी माध्यमाच्या विद्यार्थ्यांचा तृतीय भाषा इंग्रजी विषयाचा पेपर हाेता. सकाळी ११ वाजेच्या सुमारास परीक्षेला सुरूवात झाली असता, हाॅलवरील शिक्षकांनी या सर्व विद्यार्थ्यांना चक्क इंग्रजी माध्यमासाठीची प्रथम भाषा इंग्रजी या विषयाची प्रश्नपत्रिका वितरित केली.
पहिल्या पाच मिनिटांतच ‘‘आपल्याला चुकीची प्रश्नपत्रिका आली आहे’’, असे काही विद्यार्थ्यांच्या लक्षात आले. त्यांनी तशी कल्पना हाॅलवरील शिक्षकांना दिली. मात्र, दखल घेतली नाही. त्यामुळे सर्व २५ विद्यार्थ्यांनी बदलून आलेला पेपर गपगुमान साेडविण्याचा प्रयत्न केला. तीन तासांचा कालावधी संपल्यानंतर पेपर सुटला. बाहेर उभ्या असलेल्या पालकांना हा प्रकार विद्यार्थ्यांनी सांगितला. यानंतर एकच गाेंधळ उडाला. पालकांनी आक्रमक भूमिका घेत उपस्थित शिक्षकांना जाब विचारला. मात्र समाधानकारक उत्तर मिळाले नाही. यानंतर पालक अधिक संतप्त झाले. हाॅल क्रं. ४ मधील सर्व विद्यार्थ्यांचा पेपर पुन्हा घेण्यात यावा, अशी मागणी त्यांनी लावून धरली. याबाबतची माहिती शिक्षण विभागाने परीक्षा मंडळाला दिली आहे. त्यामुळे या विद्यार्थ्यांच्या बाबतीत बाेर्ड आता काय निर्णय घेते, याकडे पालकांसह परीक्षार्थींचे लक्ष लागले आहे.
धाराशिवमध्ये दहावीच्या परीक्षेत गाेंधळ pic.twitter.com/w9pODBfiKM
— Lokmat (@lokmat) March 6, 2023
काय म्हणाले शिक्षणाधिकारी?
धाराशिव शहरातील शरद पवार हायस्कूलमध्ये साेमवारी मराठी माध्यमाचे २०४, उर्दू ०३ आणि इंग्रजी माध्यमाच्या ४३ विद्यार्थ्यांची परीक्षा हाेती. इंग्रजी माध्यमाच्या विद्यार्थ्यांसाठी प्रथम भाषा इंग्रजी विषयाच्या प्रत्येकी २५ प्रश्नपत्रिकांची तीन पाकिटे आली हाेती. यापैकी एक पाकिट राखीव हाेते. नेमके हेच पाकीट हाॅल क्र. ४ मधील मराठी माध्यमांच्या मुलांना वितरित केले गेले. प्रत्यक्ष त्यांना तृतीय भाषा इंग्रजी विषयाची प्रश्नपत्रिका देणे अपेक्षित हाेते. हा प्रकार पूर्ण पेपर हाेईपर्यंत मुलांच्या लक्षात आला नाही. परेपर सुटल्यानंतर ही बाब बाहेर थांबलेले पालक तसेच गुरूजींच्या लक्षात आली. माहिती मिळताच हा प्रकार बाेर्डाला कळविण्यात आला आहे. सविस्तर अहवालही दिला जाणार आहे. एकाही मुलाचे नुकसान हाेवू दिले जाणार नाही, अशी ग्वाही बाेर्डाने दिल्याचे शिक्षणाधिकारी गजानन सूसर यांनी ‘लाेकमत’ला सांगितले.