संचारबंदीच्या काळात ११ हजार पॉझिटीविह, १५ दिवसांनंतरही रुग्णसंख्या कायम
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 5, 2021 04:53 AM2021-05-05T04:53:08+5:302021-05-05T04:53:08+5:30
संचारबंदीच्या पूर्वीचे १५ दिवस लक्षात घेता त्यावेळीही असाच दर होता. ३१ मार्च ते १४ एप्रिल या कालावधीत २२ हजार ...
संचारबंदीच्या पूर्वीचे १५ दिवस लक्षात घेता त्यावेळीही असाच दर होता. ३१ मार्च ते १४ एप्रिल या कालावधीत २२ हजार ८ चाचण्या झाल्या. त्यातून ६ हजार ५४५ रुग्ण आढळून आले. तेव्हाही पॉझिटिव्हिटी रेट हा २९.७३ टक्के इतका होता. या काळात उपचार घेऊन ३ हजार १८८ रुग्ण बरे झाल्याचे अहवाल सांगतो. हा दर मात्र, केवळ ४८.७० टक्के इतका आहे. संचारबंदीच्या काळात चाचण्या वाढल्या, ही चांगलीच बाब. मात्र, पॉझिटिव्हिटी रेट हा केवळ २ टक्क्यांनी घसरला. रुग्ण बरे होण्याचा दर फारसा बदललेला नाही. त्यामुळे संचारबंदीने केवळ पॉझिटिव्हिटी रेट आणखी वाढू दिला नाही, हेच काय ते फलित मानावे लागेल.
या कारणांमुळे रुग्णसंख्या कायम...
१. संचारबंदी लागू केली तरी नागरिकांच्या वावरण्यावर फारशा मर्यादा प्रशासनाला आणता आल्या नाहीत. त्यामुळे रस्त्यावर लोकांची वर्दळ कायम राहिली.
२. रुग्ण बाधित आल्यानंतर त्यास गृहविलगीकरणात पाठविण्यावर भर राहिला. नंतर त्यावर केवळ टेलिफोनिक वॉच उरला. परिणामी, प्रसार कायम राहिला.
३. पहिल्या लाटेत ज्याप्रमाणे रुग्ण व त्याच्या संपर्कातील लोकांचे ट्रेसिंग झाले, त्याप्रमाणे यावेळी झाले नाही. आता तर लोक स्वत:हूनच चाचणी करून घेत आहेत.
ग्रामीण भागात वाढली रुग्णसंख्या...
दुसऱ्या लाटेत रुग्ण आढळून येण्याचे प्रमाण हे शहरी भागात अधिक होते. त्यातही एकट्या उस्मानाबाद शहरानेच जवळपास निम्मा वाटा उचलला होता. मात्र, आता उस्मानाबाद शहरातील रुग्णसंख्या घटली असून, ग्रामीण भागात गावागावात संसर्ग पोहोचत आहे. कारण, ग्रामीण भागात अजूनही मास्क व सुरक्षित अंतराची काळजी घेतली जात नाही. या स्वैर वर्तनावर निर्बंध आणण्यासाठी यंत्रणाही झटकून काम करताना दिसत नाही.