प्रधानमंत्री आत्मनिर्भर योजनेतून १४५ जणांना मिळणार १० लाख
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 4, 2021 04:39 AM2021-09-04T04:39:04+5:302021-09-04T04:39:04+5:30
केंद्र शासनाने जिल्ह्याला यंदाच्या २०२१-२२ या आर्थिक वर्षासाठी १४५ जणांना कर्ज देण्याचे उद्दिष्ट समोर ठेवले आहे. कृषी विभागाच्या सहकार्याने ...
केंद्र शासनाने जिल्ह्याला यंदाच्या २०२१-२२ या आर्थिक वर्षासाठी १४५ जणांना कर्ज देण्याचे उद्दिष्ट समोर ठेवले आहे. कृषी विभागाच्या सहकार्याने बॅंकांकडून ३५ टक्के अनुदानिक रक्कम देण्याचे नियोजन यातून करण्यात आले आहे. योजना सध्या जिल्ह्यात सुरु झाली असून कृषी विभागाकडे ७ अर्ज प्राप्त झाले असल्याची माहिती देण्यात आली आहे. हे अर्ज बँकाकडून पाठवून त्यांना कर्ज देण्याची प्रक्रिया येत्या काही दिवसांत सुरू होणार आहे.
तालुकानिहाय उद्दिष्ट
उस्मानाबाद २३
तुळजापूर १७
उमरगा १६
लोहारा ११
भूम २३
परंडा १६
कळंब २३
वाशी १६
असा करु शकतील गरजू अर्ज कृषी विभागाने योजनेत सहभागी होणाऱ्या इच्छुकांसाठी पीएसएमई या शासकीय संकेतस्थळावरून अर्ज करता येतो. संकेतस्थळावरून अर्ज करणे अडचणीचे ठरत असल्यास जिल्हास्तरावर ५ जणांची संसाधन व्यक्ती अर्थात रिसोर्से पर्सन म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. त्याची संपूर्ण माहिती कृषी विभागाकडे आहे.
कोणाला घेता येणार लाभ?
जिल्ह्यात विविध पूरक उद्योग चालविणाऱ्यासह युवा उद्योजकांना योजनेत सहभागी होता येणार आहे. मिरची काडप, खाद्य प्रक्रिया आदी उद्योगाला हे अनुदान मिळणार आहे. उस्मानाबाद जिल्ह्यासाठी यंदाच्या वर्षात देण्यात आलेल्या १४५ जणांच्या उद्दीष्टातंर्गत १३० हे सर्वसामान्य गटातील १२ अनुसूचित जाती तर ३ अनुसूचित जमातीतील नागरीकांना या योजनेचा लाभ मिळणार आहे. आतापर्यंत आलेल्या ५ उद्योगांचे अर्ज बॅंकाकडे पडताळणीसाठी गेले होते. त्यात त्रुटी निघाल्याने अर्ज कृषी विभागाकडे पाठविण्यात आले आहेत. आणखी ७ उद्योगांचे अर्ज प्राप्त झाले असून, बँकाकडे पाठविण्यात आले आहेत. एक जिल्हा एक उत्पादन असे योजनेचे उद्दिष्ट असल्याने हरभरा, तूर, मूग, उडीद धान्यांच्या प्रक्रिया उद्योगाचा मार्ग मोकळा होऊन जिल्ह्यातील शेतकरी बांधवांना मोठा आर्थिक फायदाही यातून होण्याची शक्यता आहे.
बँकांच्या सहाय्याने जिल्ह्यासाठी योजना कार्यान्वित केली आहे. योजनेचा लाभ घेता यावा, यासाठी जिल्ह्यासाठी ५ रिसोर्से पर्सन नेमले आहेत. ६२ जणांनी ऑनलाईन अर्ज केले आहेत. यातील ५ अर्ज बँकाकडे पाठविले होते. त्रुटीमुळे ते वापस पाठविले आहेत. ७ अर्ज बँकाकडे पाठविले आहेत. अर्ज प्राप्त होताच ते बँकाकडे पाठविले जाणार आहे.
यु.बी. बिराजदार, कृषी अधीक्षक कृषी अधिकारी