उस्मानाबादच्या अतिवृष्टीग्रस्तांसाठी आले 148 कोटी; दिवाळीपूर्वीच होणार वितरण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 9, 2020 09:40 PM2020-11-09T21:40:55+5:302020-11-09T21:43:18+5:30
अतिवृष्टीने जिल्ह्यात 2 लाख 62 हजार हेक्टर्स शेती पिकांचे नुकसान झाले होते.
- चेतन धनुरे
उस्मानाबाद : जिल्ह्यात ऑक्टोबर महिन्याच्या मध्यात झालेल्या नुकसानीपोटी शासनाने सोमवारी पहिला टप्पा वर्ग केला आहे. यात १४८ कोटी रुपये देण्यात आले असून, दिवाळीपूर्वीच त्याचे वितरण सुरू होणार असल्याची माहिती जिल्हाधिकारी कौस्तुभ दिवेगावकर यांनी दिली.
अतिवृष्टीने जिल्ह्यात 2 लाख 62 हजार हेक्टर्स शेती पिकांचे नुकसान झाले होते. शिवाय, मनुष्य, पशुधन मृत्यू, घरांची पडझड असेही नुकसान झाले आहे. एसडीआरएफच्या निकषानुसार प्रशासनाने तातडीने पंचनामे पूर्ण करून शासनाकडे 267 कोटी 57 लाख रुपयांची मागणी केली होती. दरम्यान, शासनाने सोमवारी नुकसान भरपाईपोटी 148 कोटी 38 लाख रुपये जिल्हा प्रशासनाकडे वर्ग केले आहेत. हा पहिला टप्पा असून, दुसऱ्या टप्प्यात आणखी मदत येणार आहे. एकूण 4 लाख 6 हजार 447 शेतकऱ्यांना ही मदत मिळणार असल्याचे जिल्हाधिकारी कौतुभ दिवेगावकर यांनी सांगितले.
कोणासाठी किती मिळणार मदत?
एसडीआरएफच्या निकषानुसार कोरडवाहू पिकासाठी हेक्टरी 6800 रुपये, बागायतीसाठी 18000 रुपये मदत मिळते. शासनाने यात आपलाही वाटा घालून कोरडवाहूसाठी प्रति हेक्टरी 10000 तर बागायतीसाठी 25000 रुपये देण्याचे निश्चित केले आहे. ही मदत 2 हेक्टरच्या मर्यादेतच मिळणार आहे.
याना मिळतील इतके...
मृत पशुधनासाठी मागणीइतकेच 38 लाख 55 हजार रुपये, मयत व्यक्ती, घरांची, गोठ्याची पडझड, संसारोपयोगी साहित्य यासाठी मागणीनुसार 2 कोटी 47 लाख रुपये, खरडून गेलेल्या जमिनीसाठी 11 कोटी 86 लाख रुपये मंजूर करण्यात आले आहेत. तर कोरडवाहू व बागायती पिकांसाठी जवळपास 202 कोटी रुपयांची मागणी होती, त्यापैकी पहिल्या टप्प्यात 91 कोटी रुपये मंजूर करून ते वर्ग केले आहेत. वाढीव मदतीसाठी शासनाने 42 कोटी 61 लाख रुपयांची आपल्या निधीतून तरतूद केली आहे.