१५ चिमुकल्यांनी केली कोरोनावर मात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 4, 2021 04:25 AM2021-06-04T04:25:14+5:302021-06-04T04:25:14+5:30
मुरूम : शहरात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत आतापर्यंत २४३ कोरोना बाधित रुग्ण आढळून आले असून, यात १५ चिमुकल्यांचाही समावेश आहे. ...
मुरूम : शहरात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत आतापर्यंत २४३ कोरोना बाधित रुग्ण आढळून आले असून, यात १५ चिमुकल्यांचाही समावेश आहे. विशेष म्हणजे यापैकी ११ चिमुकल्यांनी घरीच तर चौघांनी कोविड केअर सेंटरमध्ये उपचार घेऊन कोरोनाला हरवले आहे.
शहरात ९ एप्रिलला पहिल्यांदा दहा वर्षीय बालकाला कोरोना झाल्याचे स्पष्ट झाले. यानंतर २० एप्रिलला २ ते ९ वर्षांच्या आतील चार, २२ एप्रिलला २ ते १० वर्षाच्या आतील तीन, २६ व २७ एप्रिलला प्रत्येकी एक, ५ मे रोजी तर अकरा महिन्याच्या चिमुकल्याला, यानंतर ७ मे रोजी एकाच दिवशी ५ ते ९ वर्षांच्या आतील तब्बल ४ जणांना कोरोनाची लागण झाल्याचे स्पष्ट झाले. शहरातील यशवंतनगर भागात राहणाऱ्या सर्वाधिक १० चिमुकल्यांचा यात समावेश होता. याशिवाय, संभाजीनगर तीन, नेहरूनगर व हनुमान मंदिर येथे प्रत्येकी एक अशा एकूण पंधरा चिमुकल्यांना कोरोनाची बाधा झाली होती. यापैकी अकरा जणांनी घरीच तर पाचजणांनी कोविड सेंटरमध्ये उपचार घेऊन कोरोनाला यशस्वीपणे हरवले आहे. यात अकरा महिन्यांच्या एका मुलासह दोन वर्षांखालील दोन, पाच वर्षांखालील पाच, सहा वर्षाची एक चिमुकली, आठ, नऊ व दहा वर्षांच्या प्रत्येकी दोन बालकांचा समावेश आहे.
चौकट.........
कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत शहरात १५ चिमुकल्यांना कोरोनाची बाधा झाली होती. या सर्वांना मल्टिविटॅमिन औषधे, ताप व खोकल्याची औषधे गरजेनुसार देऊन त्यांचा आजार कमी करण्याचा प्रयत्न केला. मुले लहान असल्याने बहुतांश बालकांवर घरीच उपचार करण्यात आले. ज्यांचे आई-वडील पॉझिटिव्ह होते, त्यांच्यावर कोविड सेंटरमध्ये उपचार करण्यात आले. तिसऱ्या लाटेत लहान मुलांना अधिक धोका असल्याचे सांगितले जात आहे. त्यामुळे पालकांनी वेळीच काळजी घेणे आवश्यक आहे.
- डॉ. वसंत बाबरे, वैद्यकीय अधीक्षक, ग्रामीण रुग्णालय