जमीन मोजणीसाठी घेतली १५ हजारांची लाच; परीरक्षण भूमापक लाचलुचपतच्या जाळ्यात
By सूरज पाचपिंडे | Published: May 15, 2023 06:32 PM2023-05-15T18:32:46+5:302023-05-15T18:34:07+5:30
कार्यालयातच एसीबीने केली कारवाई
धाराशिव : अतितातडीची जमीन मोजणी करण्यासाठी २० हजारांच्या लाचेची मागणी करून तडजोडी अंती १५ हजार रुपये स्वीकारणारा वाशी भूमी अभिलेख कार्यालयातील परीरक्षण भूमापक सोमवारी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने कार्यलयात रंगेहात पकडला.
तक्रारदाराने त्यांच्या नावाने असलेली जमिनीची अकृषिक अतितातडीची मोजणी करण्यासाठी वाशी येथील भूमिअभिलेख कार्यालयात अर्ज दाखल केला होता. त्यानंतर तक्रारदाराने स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये चलन भरले. तक्रारदार यांच्या जमिनीच्या मोजणीसाठी नोटीस काढून जमिनीची अतितातडीची मोजणी करून देण्यासाठी भूमिअभिलेख कार्यालयातील परीरक्षण भूमापक (निमतानदार) सुनील रामदासी (५५) याने २० हजाराची मागणी केली. तक्रारदारास लाच देणे मान्य नसल्याने त्यांनी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली.
लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने तक्रारीची शहानिशा करून १५ मे रोजी वाशी येथे सापळा लावला. यावेळी परीरक्षण भूमापाक याने पंचासमक्ष तक्रारदाराकडून २० हजारांची मागणी केली. तक्रारदाराने २० हजार रुपये देण्यास असमर्थता दाखविल्याने तडजोडी अंती १५ हजार रुपये लाच स्वीकारली. रक्कम हाती घेताच लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने परिरक्षण भूमापक सुनील रामदासी यास ताब्यात घेतले. लाच घेणाऱ्या कर्मचाऱ्याविरुद्ध वाशी ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरु आहे. ही कारवाई धाराशिव लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलिस उपअधीक्षक सिद्धाराम म्हेत्रे यांच्या मार्गदर्शानाखाली पोलिस अंमलदार दिनकर उगलमुगले, सचिन शेवाळे, विष्णू बेळे, सिद्धेश्वर तावसकर यांच्या पथकाने कारवाई केली.