सोशल मीडियात तरुणीची बदनामी करणाऱ्या तरुणाला १५ हजार दंड
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 2, 2021 12:47 PM2021-12-02T12:47:54+5:302021-12-02T12:50:21+5:30
फिर्यादीची बहीण व मैत्रीण यांची साक्ष व परिस्थितीजन्य पुरावे ग्राह्य धरून न्यायालयाने सुनावली शिक्षा
उमरगा (जि. उस्मानाबाद) : उमरगा शहरात शिक्षणासाठी वास्तव्यास असलेल्या मुलीला अश्लील भाषेत शिवीगाळ, अश्लील मेसेज करून तिचे एडिटेड फोटो सोशल मीडियात टाकल्याप्रकरणी उमरगा ठाण्यात गुन्हा दाखल झाला होता. हे प्रकरण पुढे न्यायालयात चालल्यानंतर तरुणावरील आरोप सिद्ध झाल्याने त्याला १५ हजार रुपये दंड व दंड न भरल्यास सहा महिने कैदेची शिक्षा अतिरिक्त सत्र न्यायाधीश डी. के. अनभुले यांनी सुनावली आहे.
पीडित मुलगी ही लातूर जिल्ह्यातील असून, शिक्षणासाठी ती २००९ मध्ये उमरगा शहरात वास्तव्यास होती. ती राहत असलेल्या खोलीशेजारी देवीदास बब्रुवान चव्हाण (२२, रा. बलसुर) हा तरुण राहत होता. त्याने पीडितेचा मोबाईल नंबर मिळवून तिला अश्लील भाषेत बोलणे, अश्लील एसएमएस करणे असे प्रकार केले. त्याच्या त्रासाला कंटाळून पीडिता २०१० मध्ये लातूरला आली. तेथेही या तरुणाने तिच्याच खोलीशेजारी खोली मिळवली व त्रास देणे सुरूच ठेवले. यापुढे जाऊन त्याने पीडितेचे फोटो मिळवून एडिट करीत त्याला अश्लील बनविले. हे फोटो आरोपीने त्याच्या मित्रांना पाठवून देत तिची बदनामी केली.
हा प्रकार पीडितेच्या जुलै २०१० मध्ये लक्षात आला. यानंतर तिने उमरगा ठाण्यात धाव घेऊन गुन्हा दाखल केला. उमरगा पोलिसांकडून एस. आर. ठोंगे-पाटील यांनी तपास पूर्ण करून उमरगा येथील न्यायालयात दोषारोपपत्र सादर केले. न्या. डी. के. अनभुले यांच्यासमोर या खटल्याची सुनावणी झाली. यात ११ साक्षीदार तपासण्यात आले. न्यायालयात पीडित फिर्यादी, फिर्यादीची बहीण व मैत्रीण यांची साक्ष व परिस्थितीजन्य पुरावा सादर करून अतिरिक्त शासकीय अभियोक्ता सुषमा घोडके यांनी युक्तिवाद केला. तो ग्राह्य धरून न्यायालयाने २९ नोव्हेंबर रोजी आरोपी देवीदास बब्रुवान चव्हाण यास दोषी धरत १५ हजार रुपयांचा दंड ठोठावला. तो न भरल्यास सहा महिन्यांच्या कैदेची शिक्षा सुनावली.