ऊसतोड मजूर देण्याच्या बहाण्याने १६ लाख उकळले; तिघांविरुध्द गुन्हा दाखल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 13, 2021 03:53 PM2021-03-13T15:53:40+5:302021-03-13T15:54:57+5:30
कळंब तालुक्यातील रमेश राठोड, आकाश राठोड व माणिक राठोड या तिघांशी त्यांच्यामार्फत मजूर पुरविण्याचा करार २०१९ मध्ये केला होता.
उस्मानाबाद : ऊसतोड मजूर पुरविण्याचा करार करून वेळोवेळी तब्बल १६ लाख रुपये एका व्यक्तीकडून उकळल्याचे व नंतर करार मोडल्याचा प्रकार परंडा तालुक्यात घडला आहे. या प्रकरणी गुरुवारी रात्री फसवणूक करणाऱ्या तिघांविरुद्ध परंडा ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.
परंडा तालुक्यातील वागेगव्हाण येथील रहिवासी नेमिनाथ इंद्रजीत जगताप हे कारखान्यांना ऊसतोड मजूर पुरविण्याचे काम करतात. यासाठी त्यांनी कळंब तालुक्यातील रमेश राठोड, आकाश राठोड व माणिक राठोड या तिघांशी त्यांच्यामार्फत मजूर पुरविण्याचा करार २०१९ मध्ये केला होता. यानंतर, नेमिनाथ जगताप यांनी तिघांनी वेळोवेळी केलेल्या मागणीनुसार माणिक राठोड यांच्या बँक खात्यात रकमा जमा केल्या. काही महिन्यांपूर्वीपर्यंत जगताप हे पैसे जमा करीत होते. मात्र, उपरोक्त तिघांनी त्यांना मजुरांचा पुरवठा काही केला नाही, तोपर्यंत सुमारे १५ लाख ९५ हजार रुपये जगताप यांनी राठोडच्या खात्यात जमा केले होते.
जगताप यांना मजूर मिळण्याची चिन्हे धूसर दिसू लागली, तेव्हा त्यांनी पैसे परत करण्यासाठी तगादा लावला. मात्र, तिघांनीही पैसे परत न करता मजुरांच्या कराराचा भंग केला. आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर जगताप यांनी परंडा ठाण्यात धाव घेऊन गुरुवारी सायंकाळी रमेश राठोड, आकाश राठोड व माणिक राठोड या तिघांविरुद्ध तक्रार दिली. त्यानुसार, आरोपींवर कलम ४०६, ४२० अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.