करडईच्या पेऱ्यात २० टक्क्यांची घट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 2, 2021 04:26 AM2021-01-02T04:26:37+5:302021-01-02T04:26:37+5:30

उस्मानाबाद : यंदा खाद्यतेलाच्या दरात प्रतिदिन वाढ होऊ लागली आहे. यंदा पाऊस चांगला झाल्याने अनेक शेतकऱ्यांचा ऊस लागवडीकडे ...

20 per cent reduction in safflower sowing | करडईच्या पेऱ्यात २० टक्क्यांची घट

करडईच्या पेऱ्यात २० टक्क्यांची घट

googlenewsNext

उस्मानाबाद : यंदा खाद्यतेलाच्या दरात प्रतिदिन वाढ होऊ लागली आहे. यंदा पाऊस चांगला झाल्याने अनेक शेतकऱ्यांचा ऊस लागवडीकडे कल वाढला आहे. त्यामुळे तेल पिकाची पेरणी म्हणावी तशी झालेली आहे. गतवर्षी करडीची ५ हजार ५३९ हेक्टरवर पेरणी झाली होती. यावर्षी करडीचा पेरा ४ हजार ७६१ हेक्टरवर झाला आहे. जवस व सूर्यफुलाचे क्षेत्र घटले आहे.

कोरोनाच्या लाॅकडाऊनमुळे जीवनावश्यक वस्तूंच्या किमती वाढल्या होत्या. सर्वाधिक दर हे खाद्यतेलांचे वाढले होते. दिवाळी सणाच्या तोंडावर तेलाच्या किमती दहा ते पंधरा टक्क्यांनी वाढल्या. दिवाळी सण झाल्यानंतर तेलाचे भाव उतरतील, अशी अपेक्षा ग्राहकांना होती; मात्र दिवाळी होऊन दीड महिन्याचा कालावधी लोटला, तरी खाद्यतेलाच्या दरात प्रतिदिन वाढच होत आहे. त्यामुळे ग्राहकांच्या खिशाला भुर्दंड बसत आहे. तेलाचे दर वाढत असताना दुसरीकडे मात्र तेलपिकांच्या क्षेत्रात घट होत चालली आहे. गतर्षीच्या तुलनेत सोयाबीन, भूईमूग पीक वगळता करडी, जवस, सूर्यफूल, तीळ, कारळ तेलपिकाचे क्षेत्र घटले आहे. खरिपात पाऊस चांगला झाल्याने सोयाबीनचे क्षेत्र ३५ हजार ८२६ हजार हेक्टरने वाढले आहे. भूईमुगाचा पेरा ७२८ हेक्टरने वाढला आहे. जवस २३३, करडीचे क्षेत्र ७७८ हेक्टरने घटले आहे.

चौकट...

जवस, कारळ होतेय हद्दपार

मागील दहा ते पंधरा वर्षांपूर्वी अनेक शेतकरी तेल व चटणीसाठी जवसाची लागवड करीत होते. कारळाचे क्षेत्र वाढले होते. या पिकातून शेतकऱ्यांना आर्थिक उत्पन्नही चांगले मिळत होते; मात्र त्यानंतर ऊस व इतर पिकांकडे शेतकऱ्यांचा कल वाढू लागला. त्यामुळे जवस, कारळाचे क्षेत्र घटू लागले आहे. २०१९ मध्ये जिल्ह्यात रबी हंगामात ७९२ हेक्टर क्षेत्रावर जवसाची पेरणी झाली होती. यंदा ५५९ हेक्टर क्षेत्रावर जवसाचा पेरा झाला. कारळाची लागवड गतवर्षी ४९५ हेक्टर क्षेत्रावर झाली. यंदा कारळाची २५७ हेक्टरवर पेरणी झालेली आहे.

कोट...

जिल्ह्यात तेलपीक पेरणी क्षेत्र वाढण्यासाठी कृषी विभागाच्यावतीने शेतकऱ्यांना रबी हंगामात करडी, सूर्यफूल, जवस पेरणीबाबत मार्गदर्शन करण्यात येत असते. शेतकऱ्यांना प्रोत्साहन मिळावे, यासाठी शेतकरी गटांना तेलघाना सुरू केले जात आहे. मुबलक पाणी असल्याने यंदा उन्हाळी भूईमूग पेरणी करण्याबाबत शेतकऱ्यांना आवाहन केले जात आहे.

उमेश घाटगे, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी

रानडुकरांमुळे भूईमूग लागवड कमी झाली आहे. शिवाय, जिल्ह्यात तेल पिकांवर प्रक्रिया उद्योग नाहीत. बाजारात भावही म्हणावा तसा मिळत नाही. त्यामुळे क्षेत्र घटत चालले आहे. तेलपिके महत्त्वाची आहेत. शासनाने पिकांना भाव चांगला द्यावा.

रानडुकरांमुळे भूईमूग लागवड कमी झाली आहे. शिवाय, जिल्ह्यात तेल पिकांवर प्रक्रिया उद्योग नाहीत. बाजारात भावही म्हणावा तसा मिळत नाही. त्यामुळे जवस, कारळ, सूर्यफूल, करडीचे क्षेत्र घटत चालले आहे. तेलपिके महत्त्वाची आहेत. शासनाने तेलबियांना भाव चांगला द्यावा. यंदा दोन एकर क्षेत्रावर करडीची लागवड केली आहे. रानडुकरांचा करडी पिकास धोका नाही.

बिभिषण कदम, शेतकरी.

Web Title: 20 per cent reduction in safflower sowing

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.