उस्मानाबादमध्ये जप्त केलेला २० लाखांचा गुटखा नष्ट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 23, 2020 02:00 PM2020-01-23T14:00:00+5:302020-01-23T14:04:53+5:30
जप्तीतील गुटखा, पान मसाला जाळून नष्ट करण्यात आला़
उस्मानाबाद : अन्न व औषध प्रशासनाच्या वतीने वर्षभर विविध ठिकाणी धाडी टाकून सुमारे २० लाख रुपये किमतीचा प्रतिबंधित गुटखा जप्त करण्यात आला होता़ जप्त केलेला हा गुटखा बुधवारी जाळून नष्ट करण्यात आला आहे़
सीमावर्ती भागात शेजारील कर्नाटक राज्यातून छुप्या मार्गाने गुटखा आणून त्याची सर्रास विक्री केली जात आहे़ दरम्यान, अन्न व औषध प्रशासन विभागाने वर्षभरात विविध भागात कारवाया करून २० लाख ३८ हजार ४८० रुपये किमतीचा गुटखा, पान मसाला जप्त करण्यात आला़ होता जप्तीनंतर हा मुद्देमाल अन्न व औषध प्रशासनाच्या कार्यालयातच ठेवण्यात आला होता़ यानंतर अन्न व औषध प्रशासनाचे सहायक आयुक्त कृष्णा दाभाडे यांनी दिलेल्या निर्देशनानुसार बुधवारी अन्न सुरक्षा अधिकारी रेणुका पाटील, विनायक शेटे, नमुना सहायक आकोसकर, शेंडगे यांच्यासह नगरपरिषदेच्या कर्मचाऱ्यांच्या उपस्थितीत जप्तीतील गुटखा, पान मसाला जाळून नष्ट करण्यात आला़