तुळजाभवानी देवीचे २०७ किलो सोने, २,५७० किलो चांदी वितळविण्यात येणार
By ऑनलाइन लोकमत | Published: October 7, 2023 05:34 AM2023-10-07T05:34:21+5:302023-10-07T05:34:45+5:30
मागील साडेचौदा वर्षात तुळजाभवानी देवीला अर्पण केलेल्या सोने-चांदी व जडजवाहिरांची मोजणी नुकतीच पूर्ण करण्यात आली.
धाराशिव : मागील साडेचौदा वर्षात तुळजाभवानी देवीला अर्पण केलेल्या सोने-चांदी व जडजवाहिरांची मोजणी नुकतीच पूर्ण करण्यात आली. संस्थानकडे जमा असलेले सोने व चांदी वितळविण्याच्या दृष्टीने विधी व न्याय विभागाकडे परवानगी मागण्यात आली होती. ती आता प्राप्त झाली असून, सुमारे ६० कोटी रुपये मूल्याचे सोने वितळविण्याचा मार्ग खुला झाला आहे.
देवीच्या खजिन्यात २०७ किलो सोन्याचे दागिने, तर २,५७० किलो चांदीच्या वस्तू आढळल्या आहेत.
आरबीआयची मदत
मंदिर संस्थान आरबीआयकडे सोने-चांदी वितळवून देण्यासाठी पत्रव्यवहार करणार आहे. हे दागिने वितळविण्यासाठी आरबीआय जी वेळ देईल, तेव्हा कडक सुरक्षेत सर्व दागिने निश्चित ठिकाणी नेण्यात येतील.
५५-६० टक्के सोने शुद्ध
खडे, डाग अशी वगळणी झाल्यानंतर ५५ ते ६० टक्के शुद्ध सोने मिळेल, असा अंदाज आहे. जवळपास १२० किलो अर्थात १०,२८८ तोळे शुद्ध सोने मिळू शकते. ज्याचे आजचे बाजारमूल्य जवळपास ६० कोटी आहे.