शासनाची २१ लाखांची फसवणूक; तत्कालीन मुख्याधिकाऱ्यांना पुण्यातून अटक, दोघे फरार
By बाबुराव चव्हाण | Published: August 1, 2023 12:53 PM2023-08-01T12:53:57+5:302023-08-01T12:54:34+5:30
साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे नागरी वस्ती सुधार याेजनेच्या माध्यमातून धाराशिव पालिकेला सुमारे ३ काेटी १४ लाख रूपये मंजूर झाले हाेते.
धाराशिव : साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे नागरी वस्ती सुधार याेजनेअंतर्गत २१ लाखांची शासनाची फसवणूक केल्याचे चाैकशी समितीच्या अहवालातून उघड झाले हाेते. या प्रकरणात साेमवारी रात्री सव्वाअकरा वाजता धाराशिव पालिकेचे तत्कालीन मुख्याधिकारी तथा प्रशासक हरिकल्ल्याण येलगट्टेंसह तिघांविरुद्ध आनंदनगर पाेलीस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला. यानंतर पाेलिसांनी येलगट्टे यांना मध्यरात्री पुण्यातून ताब्यात घेतले. तर उर्वरित दाेघे आराेपी मात्र फरार आहेत.
साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे नागरी वस्ती सुधार याेजनेच्या माध्यमातून धाराशिव पालिकेला सुमारे ३ काेटी १४ लाख रूपये मंजूर झाले हाेते. हा निधी संबंधित खात्यात जमा करणे बंधनकारक हाेते. मात्र, तसे न करता ही रक्कम रमाई आवास याेजनेच्या खात्यावर जमा केली. यानुषंगाने तक्रार आल्यानंतर जिल्हाधिकारी डाॅ. सचिन ओम्बासे यांनी चाैकशीचे आदेश दिले हाेते. चाैकशीअंती संबंधित खात्यावर २ काेटी ९३ लाख १४ हजार ७८ रूपये शिल्लक असल्याचे समाेर आले. उर्वरित २१ लाख ६४ हजार ९२२ रूपये तत्कालीन मुख्याधिकारी तथा प्रशासक हरिकल्ल्याण येलगट्टे , लेखापाल सुरज संपत बाेर्डे, अंतर्गत लेखानिरीक्षक प्रशांत विक्रम पवार या तिघांनी मिळून मंजूर झालेल्या कामांवर खर्च न करता याेजनाबाह्य खर्च करून शासनाची फसवणूक केल्याचा ठपका ठेवला हाेता.
दरम्यान, या अहवालाच्या आधारे पालिकेने प्राधिकृत केलेले लेखापाल अशाेक फरताडे यांनी आनंदनगर पाेलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्यावरून साेमवारी रात्री सव्वाअकरा वाजेच्या सुमारास उपराेक्त तिघांविरुद्ध भादंसंचे कलम ४०९, ४२० व ३४ प्रमाणे गुन्हा नाेंदविला. यानंतर लागलीच पाेलिसांचे पथक आराेपींच्या मागावर रवाना झाले. या पथकाने येलगट्टे यांना त्यांच्या पुणे येथील राहत्या घरातून मध्यरात्रीच्या सुमारास ताब्यात घेतले. तर उर्वरित दाेघे आराेपी फरार असून पाेलीस त्यांच्या शाेधात आहेत. प्रकरणाचा अधिक तपास पाेलीस निरीक्षक रवींद्र शिंदे हे करीत आहेत.