जलसंधारणासाठी २३ कोटींचा निधी मंजूर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 18, 2021 05:00 AM2021-02-18T05:00:10+5:302021-02-18T05:00:10+5:30
उमरगा : उमरगा-लोहारा तालुक्यातील जलसंधारण विभागांतर्गत येणाऱ्या एकूण ३५ तलावाच्या दुरूस्तीसाठी राज्य शासन व जिल्हा वार्षिक नियोजन यांच्या मार्फत ...
उमरगा : उमरगा-लोहारा तालुक्यातील जलसंधारण विभागांतर्गत येणाऱ्या एकूण ३५ तलावाच्या दुरूस्तीसाठी राज्य शासन व जिल्हा वार्षिक नियोजन यांच्या मार्फत एकूण ६ कोटी रूपये तर जलसंधारण महामंडळकडून एकूण ७४ गेटेड चेक डॅमसाठी १७ कोटी रूपये असे एकूण २३ कोटी रूपये निधी मंजूर झाला आहे.
उमरगा व लोहारा तालुक्यात ३० वर्षांपूर्वी रोजगार हमी योजनेतून या तलावांची निर्मिती करण्यात आली होती. यानंतर यंदा व यापूर्वी अनेक वेळा झालेली अतिवृष्टी व वेळेवर दुरूस्ती अभावी या सर्व तलावांची दुरवस्था झाली होती. परिणामी या सर्व तलावांची साठवण क्षमता कमी होऊन परिसरातील शेतकऱ्यांना याचा फटका बसत होता. विशेषतः या सर्व तलावांची आजवर दुरूस्ती करण्यात आली नव्हती. या अनुषंगाने आ. ज्ञानराज चौगुले यांनी जलसंधारण मंत्री व तथा जिल्ह्याचे पालकमंत्री शंकरराव गडाख यांच्याकडे विविध तलाव दुरूस्ती व नवीन चेकडॅम बांधण्यासाठीचे प्रस्ताव संबंधित विभागाद्वारे सादर करून निधीची तरतूद होण्यासाठी पाठपुरावा केला होता. यानुसार गडाख यांनी हा निधी मंजूर केला.
या तरतूद निधीतून तलावांची दुरूस्ती, अंतर्गत पाळूची उंची वाढवणे, झाडे, झुडपे काढणे, पिचिंग करून घेणे आतील बाजूस चर खोदून काळी माती भरणे, सांडवा बांधणे आदी कामे करण्यात येणार आहेत. यामुळे या तलावाच्या परिसरातील हजारो शेतकऱ्यांना सिंचनासाठी याचा फायदा होणार आहे.
या तलावांची होणार दुरुस्ती
मंजूर निधीमधून कोराळ, काळनिंबाळा, जकेकूरवाडी (येळी), जकेकूरवाडी, जकेकूर, मळगी, डिग्गी, दाळींब, हिप्परगा (रवा), आलूर, चिंचोली (भु), वरनाळवाडी, अचलेर, धानोरी, जेवळी, सास्तूर, पांढरी, सालेगाव, कडदोरा, वडगाववाडी, होळी, उंडरगाव, हराळी व समुद्राळ या पाझर तलावांची दुरूस्ती होणार आहे.
याच बरोबर उमरगा व लोहारा तालुक्यातील एकूण ३४ गावात ७४ नवीन चेक डॅम पद्धतीच्या बंधाऱ्यासाठी जलसंधारण विभागाच्या औरंगाबाद विभागाद्वारे एकूण १७ कोटी रूपये निधी मंजूर करण्यात आला आहे. यात वडगाव गांजा, फणेपूर, बेलवाडी, जेवळी, खेड , कोंडजीगड, मोघा, सास्तूर, बोरी, चंडकाळ, केसरजवळगा, कोथळी, मळगी, नारंगवाडी, वागदरी, औराद, एकूरगा, फुलसिंगनगर, इंगोले तांडा, कदेर, कवठा, कसगी, नाईचाकूर येथे प्रत्येकी २, होळी, हिप्परगा रवा, बलसूर, बेळंब, माडज, गुगळगाव, पेठसांगवी, येणेगूर येथे प्रत्येकी ३, कास्ती, लोहारा येथे प्रत्येकी चार तर बेडगा येथे ५ चेक डॅम होणार आहेत.