२३ हजार विद्यार्थ्यांनी दिली शिष्यवृत्ती परीक्षा
By Admin | Published: February 27, 2017 12:24 AM2017-02-27T00:24:25+5:302017-02-27T00:25:05+5:30
उस्मानाबाद : महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद पुणे यांच्या वतीने २०१६-१७ या शैक्षणिक वर्षात पाचवी आणि आठवीमध्ये प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांची शिष्यवृत्ती परीक्षा घेण्यात आली
उस्मानाबाद : महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद पुणे यांच्या वतीने २०१६-१७ या शैक्षणिक वर्षात पाचवी आणि आठवीमध्ये प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांची शिष्यवृत्ती परीक्षा घेण्यात आली. रविवारी झालेल्या या परीक्षेला जिल्हाभरातून सुमारे २३ हजार ३१४ विद्यार्थी बसले होते. तर ७२१ विद्यार्थी प्रत्यक्ष परीक्षेला गैैरहजर राहिले. परीक्षेदरम्यान कुठल्याही स्वरूपाचा गैैरप्रकार होवू नये, यासाठी प्रत्येक केंद्रावर बैठे पथके तैैनात केली होती. यासोबतच भरारी पथकांनीही परीक्षा केंद्रांना भेटी दिल्या.
उच्च प्राथमिक (पाचवी) शिष्यवृत्ती परीक्षेसाठी पात्र असलेल्या जिल्हाभरातील सुमारे १४ हजार २९६ तर पूर्वमाध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षेसाठी ९ हजार ७३९ विद्यार्थ्यांनी आॅनलाईन पद्धतीने नोंदणी केली होती. उपरोक्त विद्यार्थ्यांची संख्या लक्षात घेवून जिल्हा परिषद प्राथमिक शिक्षण विभागाकडून सुमारे १६३ परीक्षा केंद्राची व्यवस्था करण्यात आली होती. यामध्ये उस्मानाबाद (ग्रामीण) भागात ३३, उस्मानाबाद शहरामध्ये ०९, तुळजापूर तालुक्यात ३३, उमरगा २१, लोहारा ०९, कळंब १८, वाशी ०९, भूम १५ आणि परंडा तालुक्यातील १७ केंद्रांचा समावेश होता. उपरोक्त सर्व केंद्रावर रविवारी सकाळी ११ वाजता परीक्षेला सुरूवात झाली, असता प्रत्यक्षात २३ हजार ३१४ विद्यार्थी परीक्षेला बसले.
उर्वरित ७२१ विद्यार्थ्यांनी परीक्षेला दांडी मारली. ही परीक्षा सुरळीत आणि पारदर्शी वातावरणात व्हावी, यासाठी शिक्षण विभागाकडून तगडे नियोजन करण्यात आले होते. प्रत्येक केंद्रावर एक बैैठके पथक तैैनात करण्यात आले होते. यासोबतच आठ भरारी पथकांची नियुक्तीही करण्यात आली होती. या पथकाने परीक्षा केंद्रांना अचानक भेटी दिल्या. विशेष म्हणजे, पहिल्यांदाच काही परीक्षा केंद्रावर पोलिस कर्मचारीही तैैनात करण्यात आले होते. या नियोजनामुळे सर्व परीक्षा केंद्रावर परीक्षा सुरळीत पार पडली, असे शिक्षणाधिकारी सचिन जगताप यांनी सांगितले.