बनावट नोटा असल्याची बतावणी करून वृद्धेकडून २३ हजार हिसकावले !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 3, 2020 06:31 PM2020-03-03T18:31:45+5:302020-03-03T18:34:19+5:30
बँकेतून काढलेले पैसे मोजत असताना घडली घटना
लोहारा (जि. उस्मानाबाद) : बँकेतून बनावट नोटा येत असल्याची बतावणी करीत एका भामट्याने शहरातील ६० वर्षीय वृद्धेच्या हातातून २३ हजार रूपये लंपास केले. ही घटना लोहारा शहरातील भारतीय स्टेट बँकेत मंगळवारी सकाळी ११.१५ वाजेच्या सुमारास घडली. या प्रकरणी अज्ञाताविरूद्ध लोहारा ठाण्यात गुन्हा नोंद झाला आहे.
लोहारा शहरतील जुन्या तहसील परिसरात वास्तव्यास असलेल्या गोरोबी इब्राहीम सय्यद (वय ६०) या महिला बचतगट चालवितात. त्यांच्या बचत गटाला ६५ हजार रूपयाचे कर्ज मंजूर झाले होते. बँक खात्यावर जमा झालेली रक्कम काढण्यासाठी मंगळवारी सकाळी ११ वाजता त्या भारतीय स्टेट बँकेत गेल्या होत्या. खात्यावरील ६५ हजार रूपयांपैकी ५० हजार रूपये त्यांनी खात्यातून काढले. पैसे बरोबर आले आहेत की नाही, हे पाहण्यासाठी त्या बँकेतच पैसे मोजत होत्या.
यावेळी एका तरूणाने बँकेत येऊन ‘‘आपल्या हातातील काही नोटा बनावट आहेत’’, अशी बतावणी करून त्याने सय्यद यांच्या हातातील ५० हजारांच्या नोटांचा बंड्डल घेऊन मोजण्यास सुरूवात केली. यावेळी सदरील भामट्याने हातातील काही नोटा खाली टाकल्या. पडलेल्या नोटा घेण्यासाठी सय्यद खाली बसल्या असता, भामट्याने २३ हजार रूपये घेऊन दुचाकीवरून पोबारा केला. आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर गोरोबी सय्यद यांनी लोहारा पोलीस ठाणे गाठून फिर्याद दिली. त्यावरून अज्ञाताविरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान, बँकेतील सीसीटीव्ही कॅमे-यात संबंधित तरूणाचा चेहरा कैद झाला आहे. सदरील फुटेजच्या आधारे पोलीस त्याचा शोध घेत आहेत.