कारमध्ये पकडला पावणेतीन लाखांचा गांजा; तीन आरोपी गजाआड
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 17, 2021 06:12 PM2021-04-17T18:12:19+5:302021-04-17T18:13:16+5:30
लातूर-पुणे मार्गावरून एका महागड्या कारमधून गांजाची तस्करी सुरू असल्याची माहिती उस्मानाबाद ग्रामीण पोलिसांना मिळाली होती.
येडशी (जि. उस्मानाबाद) : सोलापूर-धुळे राष्ट्रीय महामार्गानजीक लातूर-पुणे रस्त्यावरील उड्डाणपुलाजवळ गुरुवारी मध्यरात्री ग्रामीण पोलिसांनी एका कारची झडती घेतली. तेव्हा त्यात २८ किलोग्रॅम गांजा आढळला. कार व गांजा जप्त करून पोलिसांनी तीन आरोपींना गजाआड केले आहे.
लातूर-पुणे मार्गावरून एका महागड्या कारमधून गांजाची तस्करी सुरू असल्याची माहिती उस्मानाबाद ग्रामीण पोलिसांना मिळाली होती. या माहितीच्या आधारे पोलीस निरीक्षक दत्तात्रय सुरवसे यांच्या सूचनेनुसार सहायक निरीक्षक योगेश शिंदे यांच्यासह कर्मचाऱ्यांनी गुरुवारी मध्यरात्री येडशी गावाजवळील उड्डाणपुलाजवळ सापळा रचला. तेव्हा एक महागडी कार (क्र. एम.एच.०३ बीडब्यू ९०५६) ही संशयास्पदरीत्या येथील एका हॉटेलजवळ थांबल्याचे निदर्शनास आले. पोलिसांनी लागलीच या कारची झडती घेतली. तेव्हा आत २८ किलो गांजा बेकायदेशीररीत्या ठेवून त्याची तस्करी सुरू असल्याचे आढळले.
पोलिसांनी हा २ लाख ८० हजार रुपये किमतीचा गांजा, कारसह रोख रक्कम, तीन मोबाईल असा ७ लाख ३९ हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करून आरोपी पिंटू अंबादास शिंदे (वय ३४), रामा अर्जुन शिंदे (२३), स्वाती संजय शिंदे (२७) सर्व रा. मांडवा जि. उस्मानाबाद या तिघांना ताब्यात घेतले. दरम्यान, पोलिसांना पाहताच चौथा आरोपी राजू कालिदास काळे हा घटना स्थळावरून पसार झाला. याप्रकरणी ग्रामीण ठाण्यात पहाटे गुन्हा दाखल करण्यात आला असून, तपास सहायक निरीक्षक योगेश शिंदे हे करीत आहेत.