सरकारी जमिनीवर विमा भरून सरकारलाच ३ कोटींना गंडविले; २४ सीएससी चालकांवर गुन्हा
By ऑनलाइन लोकमत | Published: April 8, 2024 06:17 PM2024-04-08T18:17:23+5:302024-04-08T18:17:43+5:30
खरीप हंगाम २०२३ मध्ये राज्य शासनाने शेतकऱ्यांना केवळ १ रुपयात विमा भरण्याची सुविधा दिली होती.
धाराशिव : मागील खरीप हंगामात धाराशिव जिल्ह्यातील सरकारी जमिनीवर शेतकऱ्यांच्या नावे विमा हप्ता भरला गेल्याची बाब उघडकीस आली आहे. कृषी विभागाने चौकशी केल्यानंतर धाराशिवसह बीड, सोलापूर, परभणी, छत्रपती संभाजीनगर, नांदेड जिल्ह्यातील २४ सीएससी चालकांनी कोट्यवधींची भरपाई ढापण्यासाठी हा उद्योग केल्याचे स्पष्ट झाले. या संबंधितांवर धाराशिवच्या आनंदनगर ठाण्यात शनिवारी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
खरीप हंगाम २०२३ मध्ये राज्य शासनाने शेतकऱ्यांना केवळ १ रुपयात विमा भरण्याची सुविधा दिली होती. शेतकरी हिस्सा जितका असेल तो राज्य शासनच भरणार असल्याचे जाहीर केले होते. ही संधी साधत पाच जिल्ह्यातील २४ सीएससी चालकांनी धाराशिव जिल्ह्यात असलेल्या २ हजार ९९४ हेक्टर सरकारी जमिनीवर ११७० शेतकऱ्यांच्या नावाने विमा हप्ता भरला. निर्णयाप्रमाणे राज्य सरकारने या शेतकऱ्यांचा विमा हिस्सा ३ कोटी १३ लाख ७१ हजार ६३५ रुपये विमा कंपनीकडे जमा केला. दरम्यान, विमा कंपनीकडून अग्रीम वाटपाची प्रक्रिया सुरू झाली तेव्हा सरकारी जमिनीवरही विमा भरला गेल्याचे अधिकाऱ्यांच्या लक्षात आले.
ही बाब जिल्हास्तरीय समितीच्या बैठकीत उपस्थित केल्यानंतर जिल्हाधिकारी डॉ. सचिन ओम्बासे यांनी जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी रवींद्र माने यांना चौकशी करून गुन्हे दाखल करण्याच्या सूचना केल्या. या अनुषंगाने केलेल्या चौकशीत तथ्य आढळून आल्यानंतर ६ मार्च रोजी कृषी उपसंचालक बाबासाहेब वीर यांनी आनंदनगर ठाण्यात तक्रार दिली. त्यानुसार पोलिसांनी २४ जणांवर शासनाची फसवणूक केल्याचा गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणाचा तपास आर्थिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक श्रीगणेश कानगुडे यांच्याकडे सोपविण्यात आला आहे.
आरोपी केंद्रचालक सहा जिल्ह्यातील...
संग्राम प्रभू मुरकुटे, राहुल शिवाजी चाटे, रवी नारायण पुरी, लक्ष्मण विनायक आघाव, महादेव गणपती वरकले, कृष्णा बालाजी आंधळे, महेश सोमनाथ बुरांडे, गजानन व्यंकट होळंबे, अजय दत्तात्रय गुट्टे, विश्वनाथ व्यंकट आघाव, अमर सुभाषराव देशमुखे, धनराज महादेव होळंबे, रवींद्र दामोदर मुंढे, नंदनी रावसाहेब होळंबे, विष्णू महादेव नागरगोजे, विजय गिरीधारी फड (सर्व जि.बीड), कृष्णा राम आंधळे, कुणाल जयदेव मुळे (दोघेही जि. छत्रपती संभाजीनगर), संदेश वैजनाथ मुंढे, धनराज उत्तम चैधर (दोघे जि. परभणी), रघुनाथ प्रभू घोडके (जि. नांदेड), नावजी सौदागर अनभुले (जि. सोलापूर), पांडुरंग जयराम भाेगील व एक अज्ञात (जि. धाराशिव) अशी या आरोपींची नावे आहेत.