‘खरिपा’साठी लागणार ३५ हजार क्विंटल साेयाबीन बियाणे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 9, 2021 04:33 AM2021-05-09T04:33:30+5:302021-05-09T04:33:30+5:30

कळंब - तालुक्यात आगामी खरीप हंगामासाठी जवळपास ३५ हजार क्विंटलच्या आसपास सोयाबीन बियाणाची गरज लागणार आहे. यास्थितीत गतवर्षीच्या बोगस ...

35,000 quintals of soybean seeds will be required for kharif | ‘खरिपा’साठी लागणार ३५ हजार क्विंटल साेयाबीन बियाणे

‘खरिपा’साठी लागणार ३५ हजार क्विंटल साेयाबीन बियाणे

googlenewsNext

कळंब - तालुक्यात आगामी खरीप हंगामासाठी जवळपास ३५ हजार क्विंटलच्या आसपास सोयाबीन बियाणाची गरज लागणार आहे. यास्थितीत गतवर्षीच्या बोगस बियाणे बाजाराचा कटू अनुभव पाठीशी असल्याने शेतकऱ्यांची फसगत होवू नये यासाठी कृषी विभागाने यंदा अधिक सतर्क राहणे गरजेचे आहे.

कळंब तालुक्याचे लोकजीवन शेतीक्षेत्रावर अवलंबून आहे. एकूण लागवडीखालील लाखभर हेक्टर क्षेत्रापैकी जवळपास ६५ हजार हेक्टर क्षेत्रावर खरीप हंगामाचा पेरा होतो. यात सोयाबीन, कापूस, तूर, उडीद, मूग आदी प्रमुख पिके घेतली जातात.

एकूणच तालुक्यातील खरीप हा प्रमुख शेतीहंगाम असून तो पूर्णपणे मोसमी पावसावर अवलंबून आहे. या हंगामाची पूर्वतयारी म्हणून एप्रिल, मे महिन्यात मशागतीची कामे करत जमीन पेरणीयोग्य केली जाते.

यानंतर समाधानकारक पाऊस झाला की, जूनच्या पहिल्या पंधरवड्यात पेरणीस सुरुवात होते. एकूणच मे महिना उजाडला की, शेतकरी आणि कृषी विभागाच्या स्तरावर पेरणीपूर्व नियोजनाची तयारी सुरू होत असते.

यानुसार प्रस्तावित क्षेत्र, लागणारे बियाणे, खते व औषधी यांचा काळा बाजार होणार नाही, टंचाई होणार यासाठी पूर्वनियोजन गरजेचे असते. यंदा मात्र चांगल्या पावसाचा अंदाज व्यक्त झाला असला तरी पेरणीपूर्व नियोजनाच्या संदर्भात सामसूम दिसून येत आहे.

चौकट...

गतवर्षीच्या कटू अनुभवातून 'धडा' घ्यावा...

गतवर्षी अनेक शेतकऱ्यांच्या सोयाबीन बियाणाला अंकुर फुटला नव्हता. वांझोट्या बियाणांचा असंख्य शेतकऱ्यांना ‘प्रसाद’ भेटला होता. यात ७१ बियाणे उत्पादक कंपन्यासंदर्भात एक हजार ४२२ तक्रारी प्राप्त झाल्या होत्या. यात एका सरकारी कंपनीच्या तक्रारीची संख्या पाचशेच्या आसपास होती. एकूणच गतवर्षी भरलेल्या बोगस बियाणांच्या बाजाराचा अनुभव पदरी असतानाही कृषी विभाग यंदा हवा तसा अ‍ॅक्टिव्ह मोडवर नसल्याचे दिसून येत आहे.

सोयाबीनचे कोठार...

तालुक्यात गतवर्षी पेरणी झालेल्या ७९ हजार हेक्टर क्षेत्रांपैकी तब्बल ६४ हजार ९९३ हेक्टर क्षेत्रावर सोयाबीनची पेरणी झाली आहे. एकूण क्षेत्राच्या ८२ टक्के क्षेत्रावर सोयाबीन पेरले गेले. यामुळेच तालुक्याला सोयाबीनचे कोठार अशी ओळख मिळाली आहे. यंदा उसाचे क्षेत्र वाढल्याने साधारणतः ६५ हजार हेक्टर पेरणी गृहीत धरले तर सोयाबीन ५० ते ५५ हजार हेक्टर क्षेत्रात पेरणी होण्याचा अंदाज आहे. यासाठी किमान ३५ हजार क्विंटल बियाण्यांची गरज लागणार आहे.

खते, बियाणे किती हवे,खुद्द साहेबांनाच नाही ठावं....

खरीप हंगाम तोंडावर आला आहे.पुढच्या पंधरवड्यात शेतकरी बियाणे, खताची जुळवाजुळव सुरू करतील. असे असले तरी तालुकास्तरावरील कृषी खात्यात मात्र याविषयी सामसूमच असल्याचे दिसून येत आहे. तालुका कृषी अधिकारी बी. बी. जाधव यांनी उसामुळे प्रस्तावित क्षेत्र कमी होणार असे सांगितले खरे. मात्र, बियाणाची गरज व मागणीसंदर्भात ते मागील पाच दिवसांत माहिती देवू शकले नाहीत. अशीच स्थिती पं.स.च्या कृषी अधिकारी विरे‌श अंधारी यांच्याशी संपर्क साधला असता दिसून आली. त्यांना खताची मागणी, उपलब्धता याची माहिती पाच दिवसांपासून देता आली नाही, हे विशेष.

Web Title: 35,000 quintals of soybean seeds will be required for kharif

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.