३९ शेतरस्त्यांनी घेतला मोकळा श्वास

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 18, 2021 04:31 AM2021-04-18T04:31:59+5:302021-04-18T04:31:59+5:30

तुळजापूर : वाढती लोकसंख्या व जमिनीच्या वाढत्या किंमती, खरेदी-विक्री यामुळे अनेक शेतकऱ्यांनी, भाऊबंदकीच्या भांडण तंट्यामुळे शेतरस्ते आणि शेतीकडे जाणाऱ्या ...

39 farmers took a deep breath | ३९ शेतरस्त्यांनी घेतला मोकळा श्वास

३९ शेतरस्त्यांनी घेतला मोकळा श्वास

googlenewsNext

तुळजापूर : वाढती लोकसंख्या व जमिनीच्या वाढत्या किंमती, खरेदी-विक्री यामुळे अनेक शेतकऱ्यांनी, भाऊबंदकीच्या भांडण तंट्यामुळे शेतरस्ते आणि शेतीकडे जाणाऱ्या पायवाटा यावर अतिक्रमण करून रस्ते अरुंद तर केलेच. शिवाय, अनेक शेतरस्ते कायमचे बंद देखील केले. यामुळे इतर शेतकऱ्यांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागत होते. शिवाय, शेतरस्त्यासाठी भांटण-तंटेही वाढले होते. शेतीच्या विकासासाठी शेतरस्त्याची गरज लक्षात घेऊन जिल्हाधिकारी कौस्तुभ दिवेगावकर यांनी लोकसहभागातून अतिक्रमणमुक्त शेतरस्ते ही चळवळ हाती घेतली. या माध्यमातून तहसीलदार सौदागर तांदळे यांनी तुळजापूर तालुक्यातील ३४ कि.मी लांबीचे एकूण ३९ शेतरस्ते अतिक्रमणमुक्त करून ८९१ शेतकऱ्यांना त्याचा लाभ मिळवून दिला आहे.

शेतरस्ता हा ग्रामीण भागातील शेती विकासाचा मुख्य घटक मानला जातो. शेतकऱ्यांना शेत रस्त्यावरूनच दळणवळण करावे लागते. मात्र, शेतात येण्या-जाण्यासाठी रस्ता नसल्याने शेतीचा अपेक्षित विकास शेतकऱ्यांना करता येत नाही. शिवाय, अनेक शेतकऱ्यांनी दोन्ही बाजुंनी रस्ते गिळंकृत केल्याने दळणवळणाची साधन संपली आहे. रस्त्याअभावी शेती पडीक राहण्याचे प्रकारही मोठ्या प्रमाणावर वाढले आहेत. शेतरस्त्याची अनेक प्रकरणे वर्षोनुवर्षे न्यायालयात व तहसील कार्यालयात प्रलंबित आहेत. यामुळे शेती विकासाला चालना देण्यासाठी जिल्हाधिकारी कौस्तुभ दिवेगावकर यांनी पुढाकार घेऊन लोकसहभागातून अतिक्रमण मुक्त शेतरस्ते ही चळवळ हाती घेतली. यात तहसील स्तरावर शेतरस्ते अतिक्रमणमुक्त करण्याच्या सूचना दिल्यानंतर तुळजापूर येथील तहसीलदार सौदागर तांदळे यांनी जिल्हाधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली ‘मागेल त्याला शेतरस्ते’ ही योजना राबविली. या अंतर्गत तहसील कार्यालयात शेतकऱ्यांच्या प्राप्त झालेल्या शेतरस्ता मागणीवरून महसूल अधिकारी, कर्मचारी यांच्या समवेत प्रत्यक्षात शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन दोन्ही बाजूच्या शेतकऱ्यांशी विचार विनिमय करून शेतरस्ते खुले केले आहेत.

आतापर्यत तुळजापूर तालुक्यातील ३४ कि.मी चे ३९ शेतरस्ते अतिक्रमण मुक्त झाले आहेत. यामध्ये सावरगाव मंडळातील ८.५ कि.मी चे ९ रस्ते अतिक्रमणमुक्त केल्याने १८५ शेतकऱ्यांना त्याचा फायदा झाला आहे. तर मंगरूळ मंडळातील ६.८ कि.मी चे ९ रस्ते मोकळे झाले सून, याचा १६० शेतकऱ्यांना लाभ झाला आहे. तसेच नळदुर्ग मंडळात १२९ शेतकऱ्यांना ५.१ कि.मी चे ५ रस्ते खुले करून दिले आहेत. जळकोट मंडळातील ८ रस्त्यांवरील ५.४ कि.मी चा रस्ता खुला करण्यात आला असून, त्याचा १३२ शेतकऱ्यांना फायदा झाला आहे. ईटकळ मंडळात ४ रस्ते अतिक्रमणमुक्त करून ४.५ कि. मी. चा रस्ता खुला केला आहे. यामुळे ८९ शेतकऱ्यांना फायदा झाला आहे. तुळजापूर मंडळातील २ शेतरस्ते अतिक्रमणमुक्त करून १.५ कि.मी चा रस्ता खुला केला असल्याने १६३ शेतकऱ्यांना त्याचा फायदा झाला असून, सलगरा दि. येथील २ शेतरस्ते खुले करण्यात येऊन १.९ कि.मी च्या रस्त्याने मोकळा श्वास घेतला आहे. त्याचा ३३ शेतकऱ्यांना फायदा झाला आहे. एकूण ३४ कि.मी चे ३९ शेतरस्ते अतिक्रमण मुक्त करून ८९१ शेतकऱ्यांना त्याचा लाभ मिळाला आहे. सदर मोहीम यशस्वी होण्यासाठी तालुक्यातील सर्व मंडळ अधिकारी व तलाठी यांनी परिश्रम घेतले.

भारत हा शेतीप्रधान देश आहे. शेतीसाठी रस्त्याची नितांत आवश्यकता असते. जिल्हाधिकारी कौस्तुभ दिवेगावकर यांच्या प्रेरणेतून तालुक्यात सुरू करण्यात आलेल्या लोकसहभागातून रस्ते अतिक्रमणमुक्त करण्याच्या मोहिमेस चांगला प्रतिसाद मिळत असून शेतकऱ्यांचे प्रश्न आणि भांडणे कायमस्वरूपी मिटणार आहेत.

- सौदागर तांदळे, तहसीलदार

दीड कि.मी. वहिवाटीचा शेत रस्ता समोरील शेतकऱ्यांनी १५ वर्षांपासून हळूहळू अतिक्रमण करून अरुंद केला होता. त्यामुळे शेतातील उत्पादित मालाची वाहतूक करणेही अवघड झाले होते. याबाबत तहसीलदारांकडे लेखी तक्रार केल्यानंतर तातडीने तहसीलदार तांदळे यांनी अधिकारी, कर्मचारी यांच्या समवेत प्रत्यक्षात येऊन शेतकरी, सरपंच, उपसरपंच, पोलीस पाटील ,तंटामुक्त समिती अध्यक्ष यांच्या समवेत बैठक घेतली. यानंतर सर्वांच्या संमतीने रस्ता रिकामा करून दिला आहे. हा रस्ता रोजगार हमीमधून मंजूर करून त्याचे कामही सध्या सुरू आहे.

- उमेश गोसावी, शेतकरी, आरळी (बु)

गावातील शेतकऱ्यांनी शेतात जाण्यासाठी रस्ता अडविला होता. त्यासाठी सतत भांडण तंटे होत होते. सन २०१२ पासून तहसील कार्यालय, जिल्हाधिकारी कार्यलय यांच्याकडे पाठपुरावा करत होतो. अखेर तहसीलदार सौदागर तांदळे यांनी या तक्रारीची दखल घेऊन प्रत्यक्षात येऊन जवळपास १ कि.मी.चा रस्ता खुला करून दिला आहे.

- वकील पठाण, शेतकरी सलगरा (दि)

Web Title: 39 farmers took a deep breath

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.