पीकविम्यासाठी ४० हजारांवर अर्ज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 1, 2021 04:23 AM2021-07-01T04:23:07+5:302021-07-01T04:23:07+5:30

उस्मानाबाद : जिल्ह्यातील ३,८१,५८४ शेतकरी हक्काच्या पीकविम्यापासून आजही वंचित असून, यासाठी शेतकऱ्यांनी कृषी सहाय्यकांकडे मागणी अर्ज द्यावेत तसेच स्थानिक ...

40,000 applications for crop insurance | पीकविम्यासाठी ४० हजारांवर अर्ज

पीकविम्यासाठी ४० हजारांवर अर्ज

googlenewsNext

उस्मानाबाद : जिल्ह्यातील ३,८१,५८४ शेतकरी हक्काच्या पीकविम्यापासून आजही वंचित असून, यासाठी शेतकऱ्यांनी कृषी सहाय्यकांकडे मागणी अर्ज द्यावेत तसेच स्थानिक स्वराज्य संस्थांचे ठराव घेऊन मुख्यमंत्र्यांकडे पाठवावेत, असे आवाहन आ. राणाजगजितसिंह पाटील यांनी केले होते. यास प्रतिसाद देत आतापर्यंत चाळीस हजारावर शेतकऱ्यांचे अर्ज कृषी विभागाकडे धडकले आहेत. शिवाय, तुळजापूर तालुक्यातील १०८ ग्रामपंचायतींनी ठराव पाठविले असल्याची माहिती आ. राणाजगजितसिंह पाटील यांनी दिली.

हरित क्रांतीचे प्रणेते आणि महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांच्या कृषी क्षेत्रातील मोलाच्या योगदानाची आठवण म्हणून त्यांचा जन्मदिवस राज्यात कृषी दिन म्हणून साजरा केला जातो. या दिवशी कै. वसंतराव नाईक यांच्या स्मृतीस अभिवादन करत विविध मार्गाने आपण बळीराजाचा सन्मान करत असतो. परंतु, मागील सहा महिन्यांपासून खरीप २०२० मधील हक्काचा पीकविमा मिळावा यासाठी शेतकरी सरकारला आर्त साद घालत असताना अजूनही जिल्ह्यातील ३ लाख ८१ हजार ५८४ शेतकरी हक्काच्या पीक विम्यापासून वंचित आहेत. सातत्याने पाठपुरावा करूनदेखील या विषयी विमा कंपनी व कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांसोबत साधी बैठकही बोलविली जात नाही.

दरम्यान, राज्य सरकारने नुकसान झाल्याचे मान्य करत अनुदान दिले, परंतु विमा भरपाईबाबत मुख्यमंत्र्यांपर्यंत प्रयत्न करूनदेखील उर्वरित शेतकऱ्यांना न्याय मिळाला नाही. त्यामुळे आता न्यायालयीन रणनीती म्हणून अनुदान मिळालेल्या परंतु विमा न मिळालेल्या शेतकऱ्यांनी आपल्या संबंधित कृषी सहाय्यकाकडे मागणी अर्ज देऊन रितसर पोहच घ्यावी तसेच स्थानिक स्वराज्य संस्थेचे ठराव घेऊन मुख्यमंत्र्यांना पाठवावेत, असे आवाहन आ. पाटील यांनी शेतकऱ्यांना व पदाधिकाऱ्यांना केले होते. याला प्रतिसाद देत जिल्ह्यातील ४० हजारांपेक्षा जास्त शेतकऱ्यांनी आतापर्यंत कृषी सहाय्यकांकडे अर्ज केले आहेत. शिवाय, अनेक ग्रामपंचायतीने ठराव घेतले आहेत. विशेषतः तुळजापूर तालुक्यातील सर्वच १०८ ग्रामपंचायतींनी ठराव घेत शेतकऱ्यांच्या हक्काची नुकसान भरपाई देण्याचे आवाहन मुख्यमंत्र्यांना पत्राद्वारे केले आहे. उर्वरित ग्रामपंचायतींनी ठराव घेण्याचे व शेतकऱ्यांनी कृषी सहाय्यकाकडे लवकरात लवकर अर्ज करण्याचे आवाहन आ. राणाजगजितसिंह पाटील यांनी केले आहे.

चौकट.........

पुढील काळात तीव्र लढा उभारणार

उस्मानाबाद जिल्ह्यातील जवळपास ८०% शेतकऱ्यांना त्यांच्या हक्काचा खरीप २०२० हंगामातील प्रलंबित पीकविमा अजूनही मिळाला नाही. या शेतकऱ्यांना न्याय मिळवून देण्याची जबाबदारी राज्य सरकारची असून या कृषीदिनी राज्य सरकारने बळीराजाच्या आर्त सादेला प्रतिसाद न दिल्यास पुढील काळात तीव्र लढा उभारण्याचा इशारा आ. पाटील यांनी दिला आहे.

--------------

[फोटो कॅप्शन : ग्रामपंचायत ठरावांच्या प्रती आमदार राणाजगजितसिंह पाटील यांच्याकडे सुपुर्द करताना तुळजापूर तालुक्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांचे प्रमुख पदाधिकारी व कार्यकर्ते.]

Web Title: 40,000 applications for crop insurance

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.