झाडे न लावताच ४० हजारांची बिले !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 8, 2021 04:39 AM2021-09-08T04:39:32+5:302021-09-08T04:39:32+5:30
कळंब : कळंब तालुक्यातील मग्रारोहयो कामाच्या अनेक सुरस कथा समोर आल्या असताना याच कामातील आणखी एक खाबुगिरी आता उघड ...
कळंब : कळंब तालुक्यातील मग्रारोहयो कामाच्या अनेक सुरस कथा समोर आल्या असताना याच कामातील आणखी एक खाबुगिरी आता उघड झाली आहे. तालुक्यातील एकुरका येथील रोहयो अंतर्गत करण्यात आलेल्या वृक्ष लागवड कामात मजुरांकरवी काम न करताच पैसे उचलल्याची गंभीर तक्रार गटविकास अधिकाऱ्यांकडे केल्याने खळबळ उडाली आहे.
काँग्रेस सेवादलाचे प्रदेश सचिव संजय घोगरे यांनी ही तक्रार केली आहे. यात एकुरका येथे ग्रामपंचायत मार्फत रोहयो अंतर्गत एकुरका ते जगदंबा मंदिर हे वृक्ष लागवड हे काम हाती घेण्यात आले होते. मात्र, झाडे लावण्यासाठी ना खड्डे खोडले ना रोपे लावली. तरीही ३५ हजार ७०० रुपये मजुरांच्या नावावर उचलल्याचे घोगरे यांनी म्हटले आहे. या कामाची तक्रार केल्यानंतर जेसीबी मशीनने वृक्षलागवडीचे खड्डे घेण्यात आले. ग्रामसेवक, पालक तांत्रिक अधिकारी यांनी संगनमताने मजुरांच्या नावे रक्कम हडप केल्याचेही घोगरे यांनी तक्रारीत नमूद केले आहे.
याबाबत माहिती घेण्यासाठी एकुरकाचे ग्रामसेवक घुले तसेच पं. स. मधील पालक तांत्रिक अधिकारी उगले यांच्याशी भ्रमणध्वनीद्वारे संपर्क साधला असता त्यांनी प्रतिसाद दिला नाही. त्यामुळे त्यांची या प्रकरणातील भूमिका समजू शकली नाही. तत्कालीन गटविकास अधिकारी राजगुरू यांचीही बदली झाल्याने नवीन गटविकास अधिकारी याबाबत काय कार्यवाही करतात, याकडे लक्ष लागले आहे.