प्राॅपर्टीच्या वादातून चाकूहल्ला, ४५ वर्षीय भाऊ ठार लाेहारा शहरातील थरार
By बाबुराव चव्हाण | Published: April 9, 2023 08:17 PM2023-04-09T20:17:39+5:302023-04-09T20:17:49+5:30
अन्य दाेन भाऊ गंभीर जखमी
लाेहारा (जि. धाराशिव) : ‘भावाच्या अंगावर गाडी का घातली,’ असा जाब विचारताच तिघा भावांवर थेट चाकूने हल्ला करण्यात आला. या थरकाप उडविणाऱ्या घटनेत ४५ वर्षीय सख्ख्या भावाचा मृत्यू झाला तर दाेघेजण जखमी झाले. ही घटना लाेहारा शहरात रविवारी सकाळी साडेदहा वाजण्याच्या सुमारास घडली. दरम्यान, घटनेनंतर आराेपी स्वत:हून पाेलिस ठाण्यात हजर झाला.
लोहारा तालुक्यातील नागराळ (लो.) येथील रमेश शेषेराव गोरे व उमेश शेषेराव गोरे या भावंडांमध्ये दोन ते तीन वर्षांपासून प्राॅपर्टीवरून वाद सुरू आहे. याच कारणावरून भावंडांमध्ये नेहमी भांडण हाेत असे. रविवारी पहाटे ५ वाजण्याच्या सुमारास उमेश गोरे हे पत्नीसह दुचाकीवरून हिप्परगा (रवा) रस्त्यालगत असलेल्या शेताकडे जात होते. याचवेळी त्यांचा भाऊ रमेश गोरे याने आपल्या ताब्यातील चारचाकी गाडीने उमेशच्या दुचाकीला धक्का दिला.
या घटनेत पती-पत्नी दुचाकीवरून पडून जखमी झाले. दरम्यान, आराेपी रमेश गोरे (३५) हा रविवारी सकाळी लोहारा शहरातील जेवळी रोडलगत असलेल्या कदम कॉम्प्लेक्सजवळील एका पान टपरीसमाेर बसला हाेता. यावेळी अनिल गोरे, सुरेश गोरे व गणेश गोरे या तिघा भावांनी आरोपी रमेशला ‘लहान भावाच्या अंगावर गाडी का घातलीस’ अशा शब्दात जाब विचारला असता, वाद सुरू झाला. हे भांडण विकाेपाला गेल्यानंतर रमेशने आपल्याजवळील चाकूने तिघांवर खुनी हल्ला केला. यात गणेश गोरे (४५) यांचा जागीच मृत्यू झाला तर अनिल व सुरेश हे दाेघे जखमी झाले आहेत.
जखमी अवस्थेत यांना तातडीने लोहारा ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. परंतु, प्रकृती गंभीर असल्याने त्यांना पुढील उपचारासाठी धाराशिवला हलविण्यात आले आहे. दरम्यान, घटनेची माहिती मिळताच पोलिस निरीक्षक अजित चिंतले, पोलिस उपनिरीक्षक रविकुमार पवार, पाेकाॅ. विठ्ठल धवण, बीट अंमलदार बोळके यांनी घटनास्थळाचा पंचनामा केला. त्यानंतर उमरगा येथील उपविभागीय पोलिस अधिकारी रमेश बरकते यांनी घटनास्थळाला भेट देऊन पाहणी केली. या घटनेचा पुढील तपास पाेनि. चिंतले हे करत आहेत.
खून केला अन् ठाणे गाठले...
लोहारा शहरातील गजबजलेल्या जेवळी रोडलगतच्या कदम कॉम्प्लेक्सनजीक चक्क भावावरच चाकूहल्ला केला. यामध्ये ४५ वर्षीय भावाचा जागीच मृत्यू झाला तर अन्य दोन भाऊ जखमी झाले. या थरारक घटनेनंतर आराेपी रमेश गाेरे (३५) हा स्वत:हून लाेहारा पाेलिस ठाण्यात हजर झाला. यानंतर त्याला ताब्यात घेण्यात आले.