गुन्ह्यात आरोपी न केल्याने ५ लाख किंवा कारची मागणी; सहायक निरीक्षकावर एसीबीची कारवाई
By चेतनकुमार धनुरे | Published: April 18, 2023 02:40 PM2023-04-18T14:40:44+5:302023-04-18T14:41:07+5:30
तडजोडी अंती ९० हजार रुपये स्वीकारण्याचे ठरले. मात्र मंगळवारी लाचेची रक्कम स्वीकारताना संशय आल्याने पोलिसांनी त्यास नकार दिला.
धाराशिव : २०१९ साली केलेल्या एका कारवाईत गुन्हा दाखल न केल्याच्या बदल्यात ५ लाख रुपये किंवा चारचाकी वाहन देण्याची मागणी परंडा येथील सहायक पोलीस निरीक्षकाने केली होती. मात्र संशय आल्याने लाच न स्वीकारणाऱ्या आरोपीवर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने मंगळवारी गुन्हा दाखल केला आहे.
सहायक निरीक्षक भगवान नाईकवाडे यांनी दहशतवाद विरोधी पथकात असताना वाशी येथे जुगारावर कारवाई केली होती. या गुन्ह्यात तक्रारदारावर गुन्हा दाखल केला. यानंतर लागलीच दरोड्याच्या आरोपाखाली इतर काही लोकावर गुन्हा दाखल केला होता. या दरोड्याच्या गुन्ह्यात तक्रारदारास आरोपी न केल्याच्या बदल्यात भागवत नाईकवाडे व पोलीस शिपाई सागर कांबळे यांनी ५ लाख रुपये किंवा सेकंड हॅण्ड चारचाकी देण्याची मागणी केली. तडजोडी अंती ९० हजार रुपये स्वीकारण्याचे ठरले. मात्र मंगळवारी लाचेची रक्कम स्वीकारताना संशय आल्याने पोलिसांनी त्यास नकार दिला. या अनुषंगाने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडून परंडा ठाण्यात दोघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.