अवघ्या १५ दिवसात कोरोनाचे ५३ रुग्ण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 31, 2021 04:24 AM2021-05-31T04:24:15+5:302021-05-31T04:24:15+5:30
नळदुर्ग : तुळजापूर तालुक्यातील येडोळा गावात अवघ्या १५ दिवसात ५३ कोरोना विषाणू बाधित रुग्ण आढळून आल्याने ग्रामस्थांसह प्रशासनाचीही चिंता ...
नळदुर्ग : तुळजापूर तालुक्यातील येडोळा गावात अवघ्या १५ दिवसात ५३ कोरोना विषाणू बाधित रुग्ण आढळून आल्याने ग्रामस्थांसह प्रशासनाचीही चिंता वाढली आहे. दरम्यान, हा संसर्ग आटोक्यात आणण्यासाठी ग्रामपंचायतीने उपाययोजना हाती घेतल्या असून, संसर्गाच्या भीतीने काही ग्रामस्थ शेतात जाऊन राहत असल्याचे दिसत आहे.
सुमारे ४५० उंबरठे असलेल्या या गावची लोकसंख्या १ हजार ६६६ असून, या गावात ९ सदस्यांची ग्रुप ग्रामपंचायत आहे. या गावात १५ मे रोजी केवळ एक कोरोना बाधित रुग्ण आढळला होता. सरपंच पद्माकर पाटील यांनी कोरोनाचा प्रादुर्भाव वाढू नये यासाठी उपाययोजना व जनजागृती केली. मात्र याकडे ग्रामस्थांनी दुर्लक्ष केले. दरम्यान, गावात सर्दी, खोकला व ताप अशी लक्षणे असलेले रुग्ण वाढू लागल्याने सरपंच व ग्रामसेवकांनी ग्रामस्थांची रॅपिड अँटिजेन टेस्ट करण्याचा निर्णय घेतला. येथील प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ. राहुल जानराव, डॉ. एम. एम शेख व आरोग्य कर्मचाऱ्यांनी २२ ते २६ मे या कालावधीत येडोळा येथील जि.प. शाळेत १५३ ग्रामस्थांची रॅपिड अँटिजेन टेस्ट केली. यात तब्बल ४० जण बाधित आढळून आले. यामुळे येडोळा गाव कोरोना रुग्णांचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेऊन तहसीलदार सौदागर तांदळे, तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. सुहास पवार, सहाय्यक पोलीस निरीक्षक जगदीश राऊत यांच्यासह महसूल, आरोग्य व पोलीस प्रशासनातील कर्मचाऱ्यांनी येडोळा गावास भेट देऊन ग्रामपंचायतीला उपाययोजना राबवण्यासाठी सल्ला दिला. येडोळा गावांतर्गत जखणी तांडा, गायरान व दक्षिण येडोळा तांड्याचा समावेश आहे. बाधित ५३ रुग्ण हे नळदुर्ग, तुळजापूर, उमरगा येथील कोविड सेंटरमध्ये तर काही इतर ठिकाणी खासगी रुग्णालयात उपचार घेत आहेत.