पाणी योजना बळकटीकरणासाठी ५६ कोटींच्या निधीचा प्रस्ताव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 22, 2021 04:21 AM2021-07-22T04:21:02+5:302021-07-22T04:21:02+5:30

कळंब : शहराचा वाढता विस्तार व लोकसंख्या पाहता कळंब पाणीपुरवठा योजनेसाठी जवळपास ५६ कोटी रुपये खर्च असलेली पाणीपुरवठा योजना ...

56 crore fund proposal for strengthening water scheme | पाणी योजना बळकटीकरणासाठी ५६ कोटींच्या निधीचा प्रस्ताव

पाणी योजना बळकटीकरणासाठी ५६ कोटींच्या निधीचा प्रस्ताव

googlenewsNext

कळंब : शहराचा वाढता विस्तार व लोकसंख्या पाहता कळंब पाणीपुरवठा योजनेसाठी जवळपास ५६ कोटी रुपये खर्च असलेली पाणीपुरवठा योजना मंजूर करण्याचा प्रस्ताव कळंब न. प. ने राज्य शासनाकडे सादर केला आहे. ही योजना कार्यान्वित झाली तर पुढील जवळपास ३५ वर्षे शहराचा पाणीपुरवठा सुरळीत होईल, असा विश्वास व्यक्त केला जात आहे.

कळंब शहर व डिकसळ गावासाठी सध्या मांजरा धरणातून असणारी पाणीपुरवठा योजना २००५ साली कार्यान्वित झाली आहे. त्या परिस्थितीच्या तुलनेत सध्या शहराचा विस्तार व लोकसंख्या वाढली आहे. सध्या व पुढील काळातही आता पाणीपुरवठा योजना तोकडी पडणार आहे. याचा विचार करून या योजनेचे बळकटीकरण करण्याचा प्रस्ताव कळंब न. प. नेे राज्याचे नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे, पाणीपुरवठा राज्यमंत्री संजय बनसोडे तसेच संबंधित विभागाला सादर केला आहे. पाणीपुरवठा मंत्री बनसोडे यांनी हा प्रस्ताव तातडीने संबंधितांकडे पुढील कार्यवाहीसाठी पाठविला आहे.

कळंब शहराची सध्याची लोकसंख्या ४० हजारांच्या घरात आहे. वाढता विस्तार पाहता प्रत्येक घरात नळाद्वारे पाणी पुरवठा करण्यासाठी आगामी काळात न. प. ला मोठी कसरत करावी लागणार आहे. त्या पार्श्वभूमीवर न. प. तील सत्ताधारी मंडळींनी घेतलेली ही भूमिका स्वागतार्ह असल्याची प्रतिक्रिया शहरवासियांतून व्यक्त होत आहे.

चौकट -

काय आहे योजना?-

या योजनेमध्ये अशुद्ध पाणी पंपिंग मशिनरी बसविणे, अशुद्ध पाण्याची पंप हाऊस मुख्य उद्भव विहीर ते जलशुद्धीकरण केंद्रापर्यंत ५०० मिमी व्यासाची पाईपलाईन टाकणे, जलशुद्धीकरण केंद्राची क्षमता वाढवून नवीन १० हजार दशलक्ष लीटर क्षमतेचे जलशुद्धीकरण केंद्राचे बांधकाम करणे, जलशुद्धीकरण केंद्रातील पंपिंग मशिनरी बदलणे, नवीन १८ लक्ष लीटर क्षमतेचा एक जलकुंभ व ७ लक्ष लीटर क्षमतेचा १ असे दोन जलकुंभ बांधणे, शुद्ध पाण्याची जलशुद्धीकरण केंद्र ते जलकुंभ पाईपलाईन टाकणे, शहरातील विस्तारित भागात नवीन पाईपलाईन टाकणे, जलशुद्धीकरण केंद्राजवळ सोलर यंत्रणा बसविणे यांचा समावेश आहे. यासाठी ५५ कोटी ६० लाख ८४ हजार रुपयांचा खर्च अपेक्षित आहे.

कोट.........

कळंब शहर व शेजारील डिकसळ गावासाठी आगामी जवळपास ३५ ते ४० वर्षांची वाढ लक्षात घेता ही योजना आम्ही तयार करून शासनाकडे प्रस्तावित केली आहे. पाणीपुरवठा राज्यमंत्री संजय बनसोडे यांची मुंबई येथे प्रत्यक्ष भेट घेऊन त्यांना याबाबत माहिती दिली. त्यांनी तत्काळ संबंधित विभागाला या योजनेच्या मंजुरीबाबत निर्देश दिले. या योजनेमुळे दरडोई १३५ लीटर पाणी उपलब्ध करून देता येणार आहे. लवकरच तांत्रिक प्रक्रिया पूर्ण होऊन या योजनेस मंजुरी मिळेल व पाण्यासाठी होणारी कळंबकरांची अडचण दूर होईल.

- संजय मुंदडा, प्रभारी नगराध्यक्ष

Web Title: 56 crore fund proposal for strengthening water scheme

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.