निराधारांची ७६८ प्रकरणे मंजूर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 23, 2021 04:49 AM2021-02-23T04:49:49+5:302021-02-23T04:49:49+5:30
उमरगा : निराधार, वृद्ध, अपंग, शारीरिक, मानसिक आजारग्रस्त, परितक्त्या, अत्याचारित, घटस्फोटित महिलांना शासन विविध योजनांच्या माध्यमातून दरमहा अर्थसाहाय्य करते. ...
उमरगा : निराधार, वृद्ध, अपंग, शारीरिक, मानसिक आजारग्रस्त, परितक्त्या, अत्याचारित, घटस्फोटित महिलांना शासन विविध योजनांच्या माध्यमातून दरमहा अर्थसाहाय्य करते. उमरगा तालुक्यात निराधार
योजनेंतर्गत लाभार्थींसाठी दरमहा तब्बल १ कोटी ९३ लाख ३५ हजार ६०० रुपयांच्या निधी वितरित केला जातो. यावर्षी विविध निराधार योजनांतून लाभ मिळावा यासाठी आलेल्या प्रस्तावांपैकी ७६८ जणांचे प्रस्ताव मंजूर करण्यात आले आहेत.
केंद्र व राज्य शासन निराधार व्यक्तींसाठी तो ज्या घटकात मोडतो त्यानुसार संबंधिताच्या बँक खात्यात अनुदानाची रक्कम जमा करते. सदर योजना सन १९८० पासून सुरू आहे. उमरगा तालुक्यात एकूण १९ हजार ७२ लाभार्थी असून, यात श्रावणबाळ योजनेतील १४ हजार १८७, इंदिरा गांधी राष्ट्रीय वृद्धापकाळ योजनेत ९ हजार ४७९, संजय गांधी निराधार योजनेत ४ हजार ८४५, इंदिरा गांधी राष्ट्रीय अपंग योजनेत ६१ तर इंदिरा गांधी राष्ट्रीय परितक्त्या योजनेतून ४३५ लाभार्थी लाभ घेतात. यांना दरमहा १ कोटी ९३ लाख ३५ हजार ६०० रुपये अनुदान दिले जाते. या विविध योजनांमुळे निराधारांना मोठा आधार मिळत आहे.
कोट........
विविध निराधार योजनेचे मानधन गेल्या चार महिन्यांपासून प्रलंबित राहिले होते. मागील आठवड्यात तहसीलमधील संबंधित विभागाकडे ऑक्टोबर, नोव्हेंबर व डिसेंबर असे तीन महिन्यांचे एकूण पाच कोटी ८० लाख ५ हजार रुपये जमा झाले असून, ते लाभार्थींच्या खात्यावर जमा करण्याचे काम सुरू आहे. पाच सहा दिवसांत सर्व लाभार्थींच्या खात्यावर पैसे पाठविण्यात येतील.
- संजय पवार, तहसीलदार