उस्मानाबाद जिल्ह्यातील ८१ प्रकल्प कोरडे; उपयुक्त जलसाठा केवळ ५ टक्केच
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 14, 2019 05:54 PM2019-03-14T17:54:33+5:302019-03-14T17:57:31+5:30
जिल्ह्यात वार्षिक सरासरीच्या केवळ ५७ टक्के पर्जन्यमान झाले.
उस्मानाबाद : जिल्ह्यात वार्षिक सरासरीच्या केवळ ५७ टक्के पर्जन्यमान झाले. भूम, परंडा या दोन तालुक्यात तर सर्वात कमी पाऊस झाला होता. अत्यल्प पर्जन्यमानामुळे जिल्ह्यातील प्रकल्प पूर्ण क्षमतेने भरले नव्हते. त्यामुळे अनेक गावांना ऐन हिवाळ्यातच टंचाईच्या झळा बसू लागल्या होत्या. सध्या अशा गावात पाण्याचा ठणठणाट निर्माण झाला आहे. आजघडीला जिल्हाभरातील २२३ पैकी ८१ प्रकल्प कोरडेठाक आहेत. तर दुसरीकडे ९१ प्रकल्प ज्योत्याखाली गेले आहेत. सर्व प्रकल्पांतर्गत मिळून केवळ ५ टक्के एवढाच उपयुक्त साठा आहे.
पावसाळ्याच्या सुरूवातीला वरूणराजाने जोरदार ऐन्ट्री केली होती. मात्र, त्यानंतर पावसाने उघडीप दिली. वार्षिक सरासरीच्या ४४५.४० मि. मी. एवढा अल्प पाऊस झाला. याचा फटका शेती पिकांना बसला. यासोबतच प्रकल्पही पूर्ण क्षमतेने भरले नाहीत. जिल्ह्यात एक मोठा प्रकल्प आहे. या प्रकल्पात गतवर्षी मार्च महिन्यामध्ये ५१.८० टक्के उपयुक्त साठा होता. यंदा मात्र उपयुक्त साठा उरलेला नाही. जिल्ह्यात मध्यम प्रकल्पांची संख्या १७ एवढी आहे. यापैकी साकत, चांदणी, खासापूरी, रायगव्हाण आणि रूई हे पाच प्रकल्प कोरडे पडले आहेत. त्याचप्रमाणे खंडेश्वर, संगमेश्वर, रामगंगा, वाघोली, तेरणा या प्रकल्पात उपयुक्त साठा उरलेला नाही. मध्यम प्रकल्पामध्ये सध्या उपयुक्त साठा केवळ ५.११ टक्के एवढा उरला आहे. आठवडाभरात जवळपास ५ टक्क्यांनी उपयुक्त साठा घटला आहे. मागील आठवड्यात ११.१६ टक्के एवढा उपयुक्त साठा असल्याचे लघु पाटबंधारे विभागाकडून सांगण्यात आले होते. दरम्यान, गतवर्षीच्या जलसाठ्यावर नजर टाकली असता, मार्च २०१८ मध्ये मध्यम प्रकल्पात ४७.६२ टक्के उपयुक्त साठा होता.
मध्यम प्रकल्पाप्रमाणेच लघु प्रकल्पांची अवस्थाही बिकट बनली आहे. २०५ पैकी ७६ प्रकल्प कोरडे पडले असून, ८५ प्रकल्प ज्योत्याखाली आहेत. ढोकी, कोल्हेगाव, करजखेडा, वडाळा, खामसवाडी, घुगी, येवती, टाकळी, केशेगाव, सांजा, वरूडा, बेंबळी आदी प्रकल्पात पाण्याचा थेंबही उरलेला नाही. लघु प्रकल्पामध्ये सध्या ५.८५ टक्के उपयुक्त साठा उरला आहे. तर लघु आणि मध्यम प्रकल्पात मिळून ५ टक्के उपयुक्त साठा आहे.
दृष्टीक्षेपात प्रकल्प
प्रकल्प संख्या पाणीसाठा
मोठे ०१ ०.०
मध्यम १७ ५.११
लघु २०५ ५.८५
एकूण २२३ ५.००
सर्वच प्रकल्प कोरडे
जिल्ह्यात लघु, मध्यम आणि मोठ्या प्रकल्पांची संख्या सव्वा दोनशेच्या घरात आहे. मात्र, अत्यल्प पर्जन्यमानामुळे या सर्वच प्रकल्पांच्या घशाला कोरड पडली आहे. यापैकी एकही प्रकल्प १०० टक्के भरलेला नाही. ५१ ते ७५ टक्क्यापर्यंत केवळ एका प्रकल्पात साठा आहे. २६ ते ५० टक्क्यापेक्षा कमी साठा असलेले प्रकल्प १९ आहेत. तर २५ टक्क्यापेक्षा कमी पाणी साठा असलेले प्रकल्प ३१ एवढे आहेत. ज्योत्याखालील प्रकल्प ९१ असून ८१ प्रकल्प कोरडे पडले आहेत.
गतवर्षी होता ३३ टक्के साठा
जिल्ह्यातील २२३ प्रकल्पामध्ये गतवर्षी ३३.०४ टक्के एवढा उपयुक्त साठा होता. या तुलनेत यंदा अल्प साठा उरला आहे. ५ टक्के एवढा साठा असल्याचे लघु पाटबंधारे विभागाने सांगितले. प्रकल्पातील जलसाठा दिवसागणिक झपाट्याने कमी होऊ लागला आहे. त्यामुळे भविष्यात ग्रामस्थांना तीव्र टंचाईला तोंड द्यावे लागू शकते.