खरीप पीक कर्ज वाटपाचे ८७ टक्के कर्ज वाटपाचे उद्दिष्ट अपूर्ण !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 26, 2021 04:32 AM2021-05-26T04:32:47+5:302021-05-26T04:32:47+5:30
उस्मानाबाद : जिल्ह्यात खरीप हंगामासाठी १४३९ कोटी ७९ लाख ४४ हजार रुपयांचे उद्दिष्ट निर्धारीत करण्यात आले आहे. असे असतानाही ...
उस्मानाबाद : जिल्ह्यात खरीप हंगामासाठी १४३९ कोटी ७९ लाख ४४ हजार रुपयांचे उद्दिष्ट निर्धारीत करण्यात आले आहे. असे असतानाही खरीप हंगाम १५ दिवसावर आला असताना केवळ ४२ हजार ३५० शेतकऱ्यांना १९१ कोटी ६२ लाख ६८ हजार रुपयांचे पीक कर्ज वाटप झाले असून, हे प्रमाण १३ टक्के इतके आहे तर अद्यापही ८७ टक्के कर्ज वाटपाचे उद्दिष्ट अपूर्ण आहे. कोरोना संसर्गामुळे उद्दिष्ट पूर्ण करण्यात अडथळा येत असल्याचे दिसून येत आहे.
वर्षादोन वर्षाआड पडणारा दुष्काळ, नापिकी, अतिवृष्टी अशा संकटामुळे शेतकरी आर्थिक अडचणीत सापडत असतो. यंदा नुकसान झाले तरी पुढील वर्षी चांगले उत्पादन मिळेल या आशेवर शेतकरी मशागत करुन पिके घेत असतात. शेतीची कामे व मशागतीसाठी शेतकऱ्यांना पैशाची गरज भासत असते. शेतकऱ्यांना शेतीच्या मशागतीसाठी वेळेवर रक्कम मिळावी, यासाठी शासनाकडून पीक कर्ज उपलब्ध करुन देण्यात येते. यंदा उस्मानाबाद जिल्ह्यासाठी खरीप हंगामासाठी १४३९ कोटी ७९ लाख ४४ हजार रुपयांचे उद्दिष्ट निर्धारीत करण्यात आले आहे. १ एप्रिल पासून प्रत्यक्ष कर्ज वितरणास सुरुवातही झाली आहे. मात्र, एप्रिल महिन्यात कोविड प्रतिबंधासाठी कडक निर्बंध लागू करण्यात आले आहेत. तसेच संचारबंदीही लावण्यात आलेली आहे. त्यामुळे या काळात एसटीची वाहतूक सेवाही बंद आहे. परिणामी, वाहतूक सेवा सुरळीत नसल्याने ग्रामीण भागातील शेतकऱ्यांना शहरात बँकामध्ये येता येत नव्हते. या कालावधीत अनेक शेतकऱ्यांनी मशागतीची कामे पूर्ण करुन घेतली. खरीप हंगाम आता केवळ १५ दिवसावर आला असतानाही केवळ ४२ हजार ३५० शेतकऱ्यांना १९१ कोटी ६२ लाख ६९ हजार रुपयांचे पीक कर्ज वितरीत झाले आहे. त्याची टक्केवारी केवळ १३ टक्के इतकी आहे. अद्यापही ८७ टक्के शेतकरी कर्ज मिळण्यापासून वंचित राहिले असून, कोरोना संसर्गामुळे उद्दिष्ट पूर्ण करण्यात अडथळा निर्माण होत असल्याचे दिसून येत आहे.
चौकट...
खते बियाणे खरेदीसाठी पैशाची जुळवाजुळव
खरीप हंगाम १५ दिवसावर येऊन ठेपला असल्याने शेतकरी खते, बियाणे खरेदीसाठी पैशाची जुळवाजुळव करण्यात गुंतले आहेत. अनेक शेतकरी पीक कर्ज घेण्यासाठी बँकामध्ये विचारणा करीत आहेत. मात्र, बँकामध्ये गर्दीच असल्याने कर्ज प्रक्रियेस विलंब होत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना खाजगी सावकारांचे उंबरठे झिझवावे लागत आहेत.
कोणी किती वाटले कर्ज
बँकाचे नाव खरीप उद्दिष्ट वितरीत
डीसीसी बॅक २२७०४.०८ १६३४७.६८
राष्ट्रीयकृत बँका ९४३७५.५२ २४८६.००
ग्रामीण बँका २६८९९.९५ ३२९.००