माकणी प्रकल्पात ९० % जलसाठा; आवक वाढली, कोणत्याही क्षणी दरवाजे उघडण्याची शक्यता

By ऑनलाइन लोकमत | Published: September 24, 2024 01:45 PM2024-09-24T13:45:56+5:302024-09-24T13:47:24+5:30

नदीकाठच्या लोहारा, उमरगा, औसा, निलंगा तालुक्यातील आणि कर्नाटकातील बिदर जिल्ह्यातील गावांना सतर्क राहण्याच्या सूचना

90% water storage in Makani Project; Possibility to open doors at any time | माकणी प्रकल्पात ९० % जलसाठा; आवक वाढली, कोणत्याही क्षणी दरवाजे उघडण्याची शक्यता

माकणी प्रकल्पात ९० % जलसाठा; आवक वाढली, कोणत्याही क्षणी दरवाजे उघडण्याची शक्यता

- बालाजी बिराजदार
लोहारा (जि. धाराशिव) :
लोहारा तालुक्यातील माकणी येथील निम्न तेरणा प्रकल्पात पाण्याचा ओघ वाढत असून , आज मंगळवारी सकाळपर्यत प्रकल्प ९०.८७ टक्के भरला आहे. असाच पाण्याचा ओघ सुरु राहील्यास मंगळवारी सायंकाळपर्यत कोणत्याही क्षणी प्रकल्पाचे दरवाजे उघडले जाण्याची  शक्यता प्रशासनाकडून वर्तविली जात आहे. शिवाय,  नदीकाठच्या लोहारा, उमरगा, औसा, निलंगा तालुक्यातील व कर्नाटकातील बिदर जिल्ह्यातील गावांना सतर्क राहण्याच्या सुचना प्रशासनाकडून देण्यात आल्या आहेत.        

लोहारा शहरासह तालुक्यात गेले अनेक वर्षापासून पावसाच्या प्रमाणात घटच होत आली आहे. त्यातच काही वेळा परतीचा पाऊस दमदार झाला. त्यामुळे हातातोंडाशी आलेली खरिपाची पिके पाण्यात वाहून गेल्याच्या घटना घडल्या आहेत. गेल्यावर्षी  अत्यअल्प पावसामुळे खरीपाच्या उत्पन्नात कमालीची घट झाली. त्यात विहीरीनी तर दिवाळीतच तळ गाठला होता. त्यामुळे लोहारा शहरासह सास्तुर, जेवळी, वडगाव, सालेगाव, धानुरी, कानेगाव, भातागळी यासह तालुक्यातील बहुतांश गावांना पाणीटंचाईचा सामना करावा लागला. दरम्यान,  यावर्षी मात्र सुरवातीपासूनच पाऊस चांगला झाला. त्यामुळे खरिपाची पिकेही जोमात आली. त्याच पावसाचे पाणी लागून काही भागात पिकांचे नुकसान झाले. 

सद्यस्थितीत तालुक्यात विहीरी, बोअरला मुबलक पाणी आहे. तसेच साठवण, पाझर तलावात ७० टक्केपेक्षा अधिक पाणी आहे. त्यामुळे पुढील वर्षातील पिण्याच्या पाण्याबरोबरच शेतीच्या पाण्याचा प्रश्न मिटला  आहे. माकणी निम्न तेरणा प्रकल्पातही गेले पंधरा दिवसापासुन पाण्याची आवक वाढत असून  मंगळवारी सायंकाळीपर्यत कोणत्याही क्षणी प्रकल्पाचे दरवाजे उघडले जाणार असल्याची शक्यता प्रशासनाकडून वर्तविली जात आहे. या अनुषंगाने नदी काठच्या लोहारा, उमरगा , औसा, निलंगा तालुक्यातील व कर्नाटकातील बिदर जिल्ह्यातील गावांना आतीदक्षतेचा इशारा उपविभागीय अधिकारी पाटबंधारे उपविभाग क्र. ३ कडून सोमवारीच देण्यात आला आहेत. 

माकणी निम्न तेरणा प्रकल्पाची पाणीपातळी ६०४.१०/६०४/४० मी. आहे. एकूण पाणीसाठा ११२.८६३ /१२१.१८८ दलघमी आहे. मृत साठा २९.९६७ दलघमी तर जिवंत साठा ८२.८९६/ ९१.२२१ दलघमी आहे. जिवंत पाणीसाठा हा ९०.८७ टक्के आहे. सध्या पाण्याची आवक १.३६७/९२.८०६ दलघमी इतकी आहे. पाण्याचा आवक दर हा १९० क्युमेक्स/ ६७०९ क्युसेक्स इतका आहे. 

दरवाजे उघडण्याची शक्यता
माकणी येथील निम्न तेरणा प्रकल्पात पाण्याचा ओघ वाढत असून असाच ओघ  सुरु राहीला तर  मंगळवारी सायंकाळ प्रकल्पाचे दरवाजे उघडण्याची शक्यता नाकारता येत नाही. 
- के. आर. येणगे, शाखाधिकारी, निम्न तेरणा धरण व जलाशय उपसा सिंचन शाखा माकणी  

नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा
माकणी येथील निम्न तेरणा प्रकल्पात पाणीसाठा ९० टक्केपेक्षा जास्त आहे. पाणीसाठ्यात वाढ होत असल्याने प्रकल्पाचे दरवाजे केव्हा ही उघडली जातील. त्यामुळे प्रशासनाकडून नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. तसेच यासंदर्भात तलाठ्यांना सुचना देण्यात आल्या आहेत. 
- काशिनाथ पाटील, तहसिलदार, लोहारा

Web Title: 90% water storage in Makani Project; Possibility to open doors at any time

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.