भांडणानंतर डोक्यात घातली बिअरची बॉटल; हॉटेल चालक महिलेच्या खून प्रकरणाचा उलगडा
By चेतनकुमार धनुरे | Published: August 22, 2022 07:09 PM2022-08-22T19:09:12+5:302022-08-22T19:10:01+5:30
हॉटेल बाहेरून कुलूप बंद असले तरी आत आढळला मृतदेह
समुद्रवाणी (जि. उस्मानाबाद) : उस्मानाबाद तालुक्यातील चिखली चौरस्त्यानजीक हॉटेल व्यावसाय चालविणाऱ्या एका महिलेचा खून झाल्याचा प्रकार रविवारी दुपारी उघडकीस आला होता. या प्रकरणातील संशयित असलेल्या तिच्या साथीदारास रविवारी रात्री उमरगा तालुक्यातून जेरबंद करण्यात आले आहे. त्यास सोमवारी ७ दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली.
लातूर जिल्ह्यातील मुरुड येथील रहिवासी असलेल्या कविता व्यंकट देशमुख या महिलेने चिखली चौरस्ता येथील दोन गाळे हॉटेल व्यवसायाच्या निमित्ताने काही दिवसांपूर्वीच भाड्याने घेतले होते. ही महिला याच ठिकाणी वास्तव्यास होती. या व्यवसायात उमरगा तालुक्यातील येणेगूर येथील संतोष हिप्परगे हा महिलेचा साथीदार म्हणून होता. दरम्यान, रविवारी दुपारपर्यंतही हॉटेल उघडले नव्हते, त्यास बाहेरून कुलूप दिसत असल्याने गाळेमालक अनिल गोडसे यांनी बेंबळी पोलिसांना याची माहिती दिली. पोलिसांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केल्यानंतर बाहेरून कुलूप असले तरी आत महिलेचा मृतदेह आढळून आला. तिच्या शरीरावर मारहाणीचे व्रण होते. त्यामुळे महिलेचा खून झाल्याची पुष्टी झाली.
पोलिसांनी या महिलेचा साथीदार संतोष हिप्परगे याचा संशयित म्हणून शोध सुरू केला. सहायक निरीक्षक मच्छिंद्रनाथ शेंडगे यांनी तपासाची सूत्रे हाती घेऊन ती गतिमान केली. तांत्रिक माहितीच्या आधारे संतोष हिप्परगे हा उमरगा तालुक्यातील आष्टा मोड येथील एका हॉटेलात असल्याचे निष्पन्न झाल्यानंतर पोलीस कर्मचारी जी.पी. मिसाळ व जी. के. सर्जे यांनी रविवारी रात्रीच त्यास तेथून ताब्यात घेतले. यानंतर सोमवारी न्यायालयासमोर हजर केले असता सात दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.
भांडण का झाले...
मयत कविता देशमुख व तिचा साथीदार संतोष हिप्परगे यांच्यात शनिवारी रात्री कडाक्याचे भांडण झाले होते. यातूनच आरोपी संतोषने बीअरची बाटली या महिलेच्या डोक्यात मारून तिचा खून केला, अशी माहिती प्राथमिक तपासातून समोर आली आहे. मात्र त्यांच्यात नेमके कशावरून भांडण झाले, याची चौकशी बेंबळी पोलीस कोठडीत करीत आहेत.