तुळजापूरच्या घाटात उलटली मोशीच्या भाविकांची ट्रॅव्हल्स; एक महिला ठार, ४५ जण जखमी

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 29, 2025 20:03 IST2025-01-29T20:03:18+5:302025-01-29T20:03:48+5:30

घाटातील एका वळणावर बस रस्त्यावरच उलटली असून सर्व भाविक मोशी व डूडुळगाव येथील रहिवासी आहेत.

A bus carrying devotees from Moshi overturned in Tuljapur Ghat; One woman killed, 45 injured | तुळजापूरच्या घाटात उलटली मोशीच्या भाविकांची ट्रॅव्हल्स; एक महिला ठार, ४५ जण जखमी

तुळजापूरच्या घाटात उलटली मोशीच्या भाविकांची ट्रॅव्हल्स; एक महिला ठार, ४५ जण जखमी

तुळजापूर (जि.धाराशिव) :पुणे जिल्ह्यातील मोशी येथून तुळजाभवानी देवीच्या दर्शनासाठी आलेली खाजगी बस बुधवारी सायंकाळी ६ वाजण्याच्या सुमारास शहरालगतच्या घाटात उलटली. या घटनेत एका महिला भाविकाचा मृत्यू झाला असून, ४५ भाविक जखमी झाले आहेत. यातील १८ जण गंभीर असल्याने त्यांना धाराशिवच्या रुग्णालयात हलविण्यात आले आहे.

अपघातातील एका जखमीने दिलेल्या माहितीनुसार पुणे जिल्ह्यातील मोशी येथील ४६ भाविकांना घेऊन एक खाजगी ट्रॅव्हल्स बुधवारी सकाळी ६ वाजता तुळजापूरकडे रवाना झाली. दुपारी १ वाजण्याच्या सुमारास तुळजापुरात दाखल झाल्यानंतर या भाविकांची सोय केलेल्या लोहिया मंगल कार्यालयात सर्वांनी जेवण घेतले. यानंतर देवीचे दर्शन करुन सर्व भाविक त्याच बसने मोशीकडे जाण्यासाठी सायंकाळी ६ वाजता परतीच्या प्रवासाला लागले. मात्र, शहराला लागूनच असलेल्या घाटातील एका वळणावर ही बस रस्त्यावरच उलटली. घटनेची माहिती कळताच पोलिसांनी तसेच शहरातील नागरिकांनी याठिकाणी धाव घेऊन जखमींना रुग्णालयात दाखल केले. या घटनेत मोशी येथील रेखा गणपत ओव्हाळ या महिला भाविकाचा मृत्यू झाला आहे. तर इतर ४५ भाविक जखमी झाले आहेत. बसमधील सर्व भाविक मोशी व डूडुळगाव येथील रहिवासी आहेत.

या जखमींना धाराशिवला हलवले...
शांताबाई बाबू बोराटे, चंदा शिंदे, विजया दीपक साबळे, सुजित बोके, विहान शिंदे, भावना नाखाले, उषा सुग्रीव शिंदे, लक्ष्मी धोत्रे, राणी फडतरे, आशा रामकरे, सारिका कुटे, बसचालक ज्ञानेश्वर बारस्कर, मारुती दसने, राधाबाई पतंगलाड, मंदाकिनी म्हेत्रे, स्वरीत अल्लाट, रुपाली गायकवाड, सुशिला बोराटे, कल्पना भारत शेळके, सुनिता अशोक भोर यांना गंभीर मार लागल्याने त्यांना तुळजापुरात प्रथमोपचार करुन धाराशिव जिल्हा रुग्णालयात हलवण्यात आले आहे. उर्वरित जखमींवर तुळजापुरातच उपचार सुरु आहेत.

भाजप कार्यकर्त्याचा उपक्रम...
अपघातग्रस्त बसमध्ये तसेच काही जखमींकडे दर्शनाचे पास आढळून आले आहेत. त्यावर आयोजक म्हणून मोशी येथील सामाजिक कार्यकर्त्या सरिता तळेकर व योगेश तळेकर यांची फोटोसह नावे आहेत. शिवाय, पासवर भाजपचे कमळ चिन्हही छापले आहे.

Web Title: A bus carrying devotees from Moshi overturned in Tuljapur Ghat; One woman killed, 45 injured

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.