विहीरीच्या पाण्यावरून वाद पेटला, कोयत्याने वार करून चुलत भावाचा खून केला
By बाबुराव चव्हाण | Published: November 13, 2023 07:14 PM2023-11-13T19:14:34+5:302023-11-13T19:15:29+5:30
विहिरीतील पाणी रबी पिकाला देण्याच्या कारणावरून घडली घटना
नळदुर्ग (जि. धाराशिव) : विहिरीचे पाणी रबी पिकांना देण्यासाठी कृषी पंपाला विद्युत जोडणी करीत असताना सख्ख्या चुलत भावानेच पाठीमागून कोयत्याने वार केले. या हल्ल्यात पंचेचाळीस वर्षीय शेतकऱ्याचा गंभीर जखमी हाेऊन मृत्यू झाला. ही धक्कादायक घटना तुळजापूर तालुक्यातील सराटी येथे साेमवारी सकाळी पावणेआठ वाजेच्या सुमारास घडली.
सराटी येथील शेतकरी नरसप्पा बाबूराव पाटील (४५) हे शेतातील रबी पिकाला पाणी देण्यासाठी रविवारी सायंकाळी विहिरीत विद्युतपंप सोडून त्यास साेमवारी सकाळी वीजपुरवठा जोडत असताना चुलत भाऊ नवनाथ अप्पाराव पाटील यांनी पाठीमागून कोयत्याने डोक्यात वार केला. या हल्ल्यात ते गंभीर जखमी झाले असता मारेकरी भाऊ घटना स्थळावरून फरार झाला. यानंतर नातेवाइकांनी गंभीर जखमी अवस्थेत नरसप्पा पाटील यांना उपचारासाठी दुचाकीवरून अणदूर प्राथमिक आरोग्य केंद्रात नेले. मात्र, दवाखाना बंद असल्याने त्यांच्यावर येथे उपचार होऊ शकले नाहीत. त्यामुळे नातेवाइकांनी त्यांना साेलापूर येथील दवाखान्यात दाखल केले. मात्र, तपासणीअंती डाॅक्टरांनी त्यांना मयत घाेषित केले. घटनेची माहिती मिळताच सपोनि स्वप्निल लोखंडे यांनी घटनास्थळी भेट देऊन गावात पाेलिस बंदोबस्त तैनात केला. घटनेतील मारेकरी फरार असून पाेलिसांनी त्याचा शाेध सुरू केला आहे. मयताच्या पश्चात आई, पत्नी व दोन मुले असा परिवार आहे.
...अन् जीव गमवावा लागला...
मयत व आराेपी यांच्या नावे सराटी शिवारात तीन एकर वडिलाेपार्जित शेतजमीन आहे. याच शेतातील विहिरीचे पाणी पिकांना देण्याच्या कारणावरून झालेल्या भांडणात एकाला जीव गमवावा लागला.