भाजपाच्या माजी आमदारास सायबर भामट्याने फसवले; एक कॉल अन् खात्यातून कॅश लंपास
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 30, 2024 18:37 IST2024-09-30T18:36:36+5:302024-09-30T18:37:35+5:30
धाराशिवमध्ये माजी आमदारांना भामट्याने गंडवले

भाजपाच्या माजी आमदारास सायबर भामट्याने फसवले; एक कॉल अन् खात्यातून कॅश लंपास
धाराशिव : सायबर फसवणुकीला सर्वसामान्य लाेक बळी पडतात. अशा घटना नित्याच्या झाल्या आहेत. असे असतानाच आता धाराशिव जिल्ह्यातील भाजपाच्या एका माजी आमदारांनाही भामट्याने गंडा घालून खात्यातील १९ हजार ९६९ रुपये ऑनलाइन काढून घेतले. याप्रकरणी २८ सप्टेंबर राेजी परंडा पाेलिस ठाण्यात अज्ञाताविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
भाजपाचे माजी आमदार सुजितसिंह मानसिंह ठाकूर (५७, रा. राजापूर गल्ली, परंडा) यांना २४ जुलै २०२४ राेजी सकाळी साडेनऊ वाजण्याच्या सुमारास माेबाइलवर ९११४१२८२००७४ या क्रमांकावरून काॅल आला. ‘आपल्या खात्यावरून ४ हजार ४९० रुपयांचा ट्रान्सफर व्यवहार केला नसल्यास १ बटण दाबावे,’ असे सांगितले. त्यांनीही लागलीच माेबाइलवरील १ हे बटण दाबले असता, बँक खात्यातून १९ हजार ९६९ रुपये ऑनलाइन पद्धतीने काढून घेतले. आपली फसवणूक झाल्याचे समाेर आल्यानंतर माजी आमदार ठाकूर यांनी परंडा पाेलिस ठाण्यात फिर्याद दाखल केली. त्यावरून २८ सप्टेंबर राेजी अज्ञात भामट्याविरुद्ध भा. न्या. सं.चे (बीएनएस) कलम ३१८ (४) सह माहिती तंत्रज्ञान कायद्याचे कलम ६६ (डी) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.